Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले, राज्यातील कारभाराबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:38 PM2021-03-16T19:38:16+5:302021-03-16T19:43:27+5:30
Sharad Pawar spoke on the Sachin Vaze case : सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर कालपासून महाविकास आघाडीमधील हे बडे नेते सातत्याने बैठका घेत आहे. दरम्यान, शरद पवार यांनी सचिन वाझेंवर झालेल्या कारवाईबाबत आज पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आहे.
नवी दिल्ली/ मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भऱलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली होती. या कारवाईमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची मोठी कोंडी झाली आहे. तसेच विरोधक या प्रकरणावरून अधिकाधिक आक्रमक होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) शिल्पकार शरद पवार यांचीही चिंता वाढलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर कालपासून महाविकास आघाडीमधील हे बडे नेते सातत्याने बैठका घेत आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी सचिन वाझेंवर झालेल्या कारवाईबाबत आज पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आहे. (For the first time, Sharad Pawar spoke openly on the Sachin Vaze case, he said There are no problems in Maha Vikas Aghadi)
सचिन वाझेंना झालेली अटक आणि राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबत दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत विचारले असता शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. सरकारमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात योग्य काम करतेय आणि आम्ही मिळून पुढे जात आहोत. काही अडचणी येताहेत मात्र त्यावर आम्ही मिळून मार्ग काढत आहोत.
There are no problems in Maha Vikas Aghadi. The Maharashtra government led by Uddhav Thackeray is working properly: NCP Chief Sharad Pawar, in Delhi pic.twitter.com/FDoZoxmOJT
— ANI (@ANI) March 16, 2021
यावेळी सचिन वाझे प्रकरणाबाबत शरद पवार म्हणाले की, या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. एनआयएकडून सुरू असलेल्या तपासाला सहकार्य करणं राज्य सरकारचं काम आहे आणि राज्य सरकार तपासासाठी एनआयएला सहकार्य करत आहे. जर कुणी अधिकारांचा गैरवापर केला असेल, चुकीचं काम केलं असेल तर त्याला योग्य ती जागा दाखवून देण्यासाठी आम्ही तपासात सहकार्य करू. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत विचारले असता शरद पवार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणी शरद पवार यांना विचारले असता तेव्हा शरद पवार यांनी हा स्थानिक प्रश्न असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. मात्र सचिन वाझे यांच्याभोवती एनआयएच्या चौकशीचे जाळे अधिकाधिक घट्ट होऊ लागल्यानंतर शरद पवार यांनी सूत्रे हाती घेत राज्य सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी सूचना देण्यास सुरुवात केली होती.