Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:00 AM2021-03-22T04:00:34+5:302021-03-22T07:19:23+5:30

‘लेटर बॉम्ब’चे तीव्र पडसाद, यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांचे बैठक सत्र सुरू आहे.

Sachin Vaze: Government embroiled, opposition aggressive; Anil Deshmukh's resignation in the Chief Minister's court | Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

googlenewsNext

मुंबई/नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट झाल्याने महाविकास आघाडी सरकारची पुरती कोंडी झाली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन छेडले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तो चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.    

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळणे, नंतर या गाडीची मालकी असलेले मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट होणे व आता परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर पैसे वसुलीचा आरोप करणे, या घटनांमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरले असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांचे बैठक सत्र सुरू आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांची भेट घेऊन चर्चा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख हेही उद्या दिल्लीत पोहोचत आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. 

बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल लपविला : फडणवीस 
तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीदेखील सरकारकडे खळबळजनक अहवाल सादर केला होता. तपासानंतर पोलीस बदल्यांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याचे पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले होते. मात्र, तो स्फोटक अहवाल शासनाने लपविल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सत्तेपुढे शहाणपण नसते : राऊत 
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप सनसनाटी आणि खळबळजनक आहेत. त्यामुळे त्यातील सत्यतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली  राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणात काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होते. सत्तेपुढे शहाणपण नसते, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी लेटर बॉम्ब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. 

आरोप गंभीर, चौकशी  झाली पाहिजे - शरद पवार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी राजधानीत व्यक्त केले. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि गृहमंत्र्यांवरील कारवाईबाबत योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

 

Web Title: Sachin Vaze: Government embroiled, opposition aggressive; Anil Deshmukh's resignation in the Chief Minister's court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.