Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 04:20 AM2021-03-21T04:20:53+5:302021-03-21T04:21:58+5:30

Mukesh Ambani Bomb Scare: भाजपकडून शिवसेनेवर सभागृहात हल्ला होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे एरवी आक्रमक राहणारे मंत्री शांत बसून होते

Sachin Vaze: Parambir Singh's 'letterbomb' blames allegations from Sena to NCP; Curiosity about the role of the Chief Minister | Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

Next

यदू जोशी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटरबॉम्ब’मुळे अँटिलिया-वाझे प्रकरणात आतापर्यंतच्या टीकेचा आणि आरोपांचा रोख आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे सरकला आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा शिवसेनेकडून बचाव केला जात असल्याचा आरोप भाजप सुरुवातीपासून करत आहे. वाझे यांच्या निलंबनाची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी वाझे यांना का वाचवले जात आहे? असा सवाल करत टीकेचा रोख शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवला होता.

भाजपकडून शिवसेनेवर सभागृहात हल्ला होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे एरवी आक्रमक राहणारे मंत्री शांत बसून होते. तसेच, राष्ट्रवादीचे आमदारही फारसे शिवसेनेच्या मदतीला धावले नाहीत. या प्रकरणात जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल, मात्र अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांनी कुठलीही चूक केलेली नाही, असे जोरदार समर्थन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पूर्णपणे देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र समोर आले. अँटिलिया प्रकरण, त्यातील सचिन सचिन वाझे यांचा कथित सहभाग या गोष्टी पूर्णपणे पोलीस अधिकारी  पातळीवरील आहेत आणि त्यात गृहमंत्र्यांचा कुठलाही सहभाग नाही, अशी भूमिका एकप्रकारे राष्ट्रवादीकडून घेतली गेली.

शिवसेनेच्या मुंबई ठाण्यातील काही स्थानिक नेत्यांची नावेही या प्रकरणात जोडली गेली होती. शिवसेनेच्या बड्या नेत्यांपर्यंत या प्रकरणाची तार पोहोचेल, अशा पद्धतीने भाजपचे काही नेते दावे करत होते. युवा शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांच्याबाबतही आरोप केले गेले. ते ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. याबाबत काय ती चौकशी होईल ती होवो, पण परमबीर सिंग यांच्या पत्राने आरोपांची दिशा मात्र बदलली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीकडून त्यांचा बचाव करण्यात आला. आता देशमुख यांचा बचाव करण्यात राष्ट्रवादीला यश येते का आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

आरोपांची दिशा बदलण्यावर सेनेत खलबते
यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारमधील दोन प्रमुख पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत ‘ब्लेमगेम’ समोर येताना दिसत आहे. अँटिलिया प्रकरण समोर आल्यापासून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे शिवसेनेत अस्वस्थता होती. 
आरोपांची दिशा कशी बदलायची, याबद्दल खलबते सुरू होती, अशी माहिती आहे. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे असतानादेखील संपूर्ण प्रकरण शिवसेनेवर शेकविले जात होते. 

त्यातच वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का? वाझे हे अत्यंत प्रामाणिक  आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, अशी पावती शिवसेना नेत्यांकडून दिली गेल्याने शिवसेनेभोवती संशयाचे धुके अधिकच दाट झाले होते. परमबीर सिंग यांच्या पत्राने त्याचा रोख राष्ट्रवादीकडे वळला आहे.

Web Title: Sachin Vaze: Parambir Singh's 'letterbomb' blames allegations from Sena to NCP; Curiosity about the role of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.