Sachin Vaze:“आता नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुखांप्रमाणे अनिल परबही राजीनामा देणार का?”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:04 AM2021-04-08T08:04:13+5:302021-04-08T08:11:35+5:30
Sachin Vaze Explosive letter against Anil Parab and Anil Deshmukh: शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब(Shivsena Anil Parab) यांनी कंत्राटादारांकडून वसुली करण्यासाठी दबाव टाकला होता असं सचिन वाझेने पत्रात दावा केला आहे.
मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते. या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. त्यानंतर अनिल देशमुखांनी(Anil Deshmukh) नैतिकतेच्या आधारे गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे(Uddhav Thackeray) राजीनामा सुपूर्द केला. हे प्रकरण ताजे असतानाच निलंबित सचिन वाझेनेही(Sachin Vaze) पत्राच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचं नाव घेतलं आहे.
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब(Shivsena Anil Parab) यांनी कंत्राटादारांकडून वसुली करण्यासाठी दबाव टाकला होता असं सचिन वाझेने पत्रात दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) यांनी ट्विट केलंय की, सचिन वाझेने खळबळजनक विधान केले आहे. आणखी एका मंत्र्यावर वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना अडकली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रमाणे हे मंत्रीही राजीनामा देतील का? हा नैतिकतेचा प्रश्न आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
निलंबित पुलिस अधिकारी वाज़े का सनसनीख़ेज़ इकबालिया बयान।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 7, 2021
एक और मंत्री पर वसूली का आदेश देने का आरोप।
इस बार शिवसेना लपेटे में आई है।
क्या पूर्व गृहमंत्री की तरह ये मंत्री भी जाएँगे ?
नैतिकता का तक़ाज़ा तो यही है।#NIA#Vaze
सचिन वाझेने पत्रात काय आरोप लावला आहे?
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटी, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका कंपनीकडून ५० कोटी, तर मुंबईच्या ५० ठेकेदारांकडून २ कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असा सनसनाटी आरोप वाझेने केला आहे. NIA कोर्टाला उद्देशून स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या कथित पत्रात त्याने हा दावा केला आहे. मात्र कोर्टात हे पत्र सादर केलेले नाही.
NIA च्या कोठडीत असलेल्या वाझेने इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात ३ एप्रिलची तारीख आहे. त्याची प्रत ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर देशमुख यांनी मला फोन करून शरद पवार यांनी तुम्हाला निलंबित करण्यास सांगितले आहे, त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी २ कोटींची मागणी केली. त्यावर आपल्याला शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पैसे नंतर देण्यास सांगितले. पुन्हा जानेवारीत भेटलो असताना त्यांचा पीए कुंदन याने १,६५० बारमधून प्रत्येकी ३ ते ३.५० लाख दर महिन्याला मिळवून देण्यास सांगितले. त्यालाही आपण नकार दिला. परब यांनी जुलै/ऑगस्टमध्ये आपल्याला बोलावून ‘एसबीयूटी’ची चौकशी सुरू करून ५० कोटींची मागणी करण्यास सांगितले. ते शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा या वर्षी जानेवारीत बोलावून मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेल्या ५० ठेकेदारांची चौकशी पुन्हा सुरू करण्यास सांगून त्यांच्याकडून २ कोटी वसूल करण्याची सूचना केली होती; पण त्यालाही आपण नकार दिला होता आणि ही बाब आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून सांगितली होती. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती त्यांना बोलून दाखवल्यावर त्यांनी आपल्याला काम करत राहण्याची सूचना केली होती.