“शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 07:51 AM2021-08-02T07:51:52+5:302021-08-02T07:56:19+5:30
जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.
मुंबई – मराठी माणसांच्या न्याय्य, आशा–आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच…असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर असा इशाराच सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला दिला आहे. (Shivsena Warning BJP over Prasad Lad Statement on Shivsena Bhavan)
तसेच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत. ‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
शिवसेना आहे म्हणूनच मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने व कण्याने उभा आहे हीच त्या सगळय़ांची भावना आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत दादर मुक्कामी असलेल्या शिवसेना भवनाच्या दर्शनी भागी जसा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे तसा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचाही तेजस्वी पुतळा आहे.
त्या भवनावर शिवरायांचा भगवा झेंडा डौलाने फडकत आहे. या भगव्या झेंडय़ाचा पोटशूळ काही मंडळींना उठल्यामुळेच शिवसेना भवन फोडण्याची मस्तवाल भाषा त्यांनी केली. खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही.
पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही.
भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जरा जोरातच बांग देतो व आपणच कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे.
जनता पक्षाच्या काळातही काही मंडळींनी असाच उतमात केला. शिवतीर्थावरील एका सभेच्या निमित्ताने शिवसेना भवनावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची पार्सले कोणत्या स्थितीत घरी किंवा इस्पितळात पोहोचली याचा इतिहास भाजपमधील बाटग्यांनी समजून घ्यावा. शिवसेना भवनाशी पंगा घेतल्याने त्यांचा तो जनता पक्ष भविष्यात औषधालाही शिल्लक राहिला नाही.
रजनी पटेल हे महाशय आजच्या पिढीस माहीत नसतील, पण मुंबईच्या राजकारणात व दिल्लीतील काँग्रेस दरबारी त्यांचे भलतेच वजन होते. शिवसेना बरखास्त करून शिवसेना भवनास टाळे लावण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते रजनी पटेल राजकारणातून व सार्वजनिक जीवनातून कायमचे नामशेष झाले.
१९९२ च्या ‘बाबरी’ दंगलीत हेच शिवसेना भवन हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीरपणे मराठी व हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून उभे होते. तेव्हा आजचे हे बाटगे दंगलखोर पाकड्यांना घाबरून घरातच गोधडय़ा भिजवत होते. ‘‘आम्ही बाबरी पाडली नाही हो।।’’, असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी ‘सामना’ करू पाहतात ही आडवाणी – अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय?
शिवसेना अनेक अग्निदिव्यांतून पावन होऊन पुढे गेली आहे. धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेनेचे बळ कधीच नव्हते. तर तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचे बळ राहिले. शिवसेना ही ज्वलंत मराठी मनाची संघटना म्हणून कायम स्वबळावरच जगत आहे. आरामखुर्चीवाले तत्त्वज्ञान आणि बाटग्यांच्या गोतावळ्यातले मखरबंद राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही.
सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. जी शिवसेना घरभेद्यांच्या निषेधाच्या आरोळय़ांनी गडबडली नाही, दिलेल्या शब्दास न जागणाऱ्या भाजपच्या फसवेगिरीने नाउमेद झाली नाही. उलट आज ती महाराष्ट्राची सत्ताधारी झाली.
हा इतिहास सध्याच्या सत्ताबाज बाटग्या कमलकांतांना कसा समजणार? भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! कशात काही नसताना झुरळांच्या तांडय़ासारखे आपापल्या खुराडय़ाच्या गच्चीवर येऊन नरडी फुगवून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित!
कालपर्यंत पुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी पुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही.
एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे!