भाजपाचे ९ नगरसेवक नॉट रिचेबल; अंतर्गत कुरबुरी अन् राष्ट्रवादीने नाराजांवर टाकला डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:47 AM2021-02-19T09:47:08+5:302021-02-19T09:49:35+5:30
BJP Internal Disputes over Municipal Mayor Election in Sangli: महापौर, उपमहापौरपदावरून भाजपात अंतर्गत कुरबुरीमुळे निवडणुकीला रंगत आली आहे, यातच गुरुवारी भाजपात फूट पडल्याचंही दिसून आलं
सांगली – महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपामध्येच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महापौर पदासाठी इच्छुकांनी भाजपा नेतृत्वावर दबावतंत्र वापरलं आहे, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी ४ उमेदवारांनी ९ तर उपमहापौरपदासाठी ६ अर्ज दाखल केले. भाजपाकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.(BJP 9 Corporators not reachable in Sangli Miraj Municipal Mayor Elections)
महापौर, उपमहापौरपदावरून भाजपात अंतर्गत कुरबुरीमुळे निवडणुकीला रंगत आली आहे, यातच गुरुवारी भाजपात फूट पडल्याचंही दिसून आलं, पक्षाच्या ९ नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवली असून ते नॉट रिचेबल आहेत. पक्षाच्या बैठकीला ३०-३२ नगरसेवक उपस्थित होते, त्यातच रात्री ३ नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपाला यश आलं, आता ३० नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आलं आहे.
महापौर, उपमहापौर निवडीवरून भाजपात गटबाजी होती, भाजपाने महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम नावं निश्चित केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अँक्शन मोडमध्ये आले, त्यांनी भाजपाच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू झाले.. भाजपाचे १३ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले होते, त्यातील चौघांना अज्ञातस्थळी हलवले तर आणखी ४ जणांशी चर्चा सुरू होती.
तिघेजण नगरसेविकेच्या घरात अज्ञातस्थळी जाण्यासाठी जमले होते, भाजपाच्या एका नगरसेविकेसोबत बोलणी फिस्कटली, त्यानंतर राष्ट्रवादीच्या रणनीतीची माहिती भाजपा नेत्यांना दिली, आतापर्यंत बेसावध असलेल्या भाजपाच्या नेत्यांसह महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि त्यांचे समर्थक खडबडून जागे झाले, त्यांनी थेट नगरसेविकेचे घर गाठले, याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थकही त्यांच्या घरासमोर जमा झाले होते.
महापौर, उपमहापौर पदांची निवडणूक २३ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाईन पद्धतीने होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची मुदत होती. या मुदतीत महापौरपदासाठी भाजपाचे धीरज सूर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, तर राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी या चारजणांनी अर्ज दाखल केले, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या गजानन मगदूम यांच्यासह काँग्रेसकडून उमेश पाटील, तर राष्ट्रवादीकडून सविता मोहिते व स्वाती पारधी यांचे अर्ज दाखल झाले.
अडीच वर्षांत तीन महापौर, उपमहापौर
सत्ताधारी भाजपाने पुढील अडीच वर्षांत तीन महापौर व तीन उपमहापौर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक महापौर-उपमहापौरांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सूर्यवंशी यांच्यानंतर निरंजन आवटी व शेवटच्या दहा महिन्यांत अजिंक्य पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमहापौर पदाबाबत मात्र ज्या त्या वेळी निर्णय घेतले जातील, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी सांगितले. गटनेते पदाबाबतही हाच निकष लावण्यात आला असून, आणखी दोघांना गटनेतेपदाची संधी दिली जाणार आहे.