"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 12:14 PM2024-10-06T12:14:22+5:302024-10-06T12:17:19+5:30
Sanjay Raut PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य केले. मोदींनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले. राऊतांनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत.
Maharashtra Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पंतप्रधान मोदींचे राज्यातील दौरे वाढले आहेत. शनिवारी (५ ऑक्टोबर) ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला आज खासदार संजय राऊतांनी उत्तर देताना काही प्रश्न विचारले. जळगावमध्ये संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमातून काँग्रेसवर टीका केली. दिल्लीत पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस नेत्याचा सहभाग असल्याचं मोदी म्हणाले. त्याला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन रोज खोटं बोलतात. त्यांनी अकोल्यात अमली पदार्थांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. काँग्रेस अमली पदार्थाच्या पैशावर निवडणूक लढतोय, असे ते म्हणाले. मग गुजरातमधील मुद्रा पोर्ट ड्रग्ज पकडले. त्यावर मोदी बोलत नाही. हा पोर्ट कोणाचा आहे, तर गौतम अदानींचं. अफगाणिस्तानातून येणारे ड्रग्ज उतरवण्यासाठी मुद्रा पोर्टचीच निवड का केली? यावर मोदींनी बोललं पाहिजे", असे उत्तर राऊतांनी दिले.
तुमच्या पायाशी कोण बसले आहे? राऊतांचा मोदींना सवाल
"महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरण घडलं. ललित पाटीलला संरक्षण देणारी लोकं मिंधे आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले. त्यांच्या व्यासपीठावर संजय राठोड होते. त्यांच्यावर पूजा चव्हाण हत्या/आत्महत्येचा आरोप आहे. त्या महिलेच्या घरातही नशेचे पदार्थ सापडले होते. तिथे या मंत्र्याचे जाणं-येणं होतं. तुम्हाला अमली पदार्थांची एवढी चिंता आहे, पण तुमच्या पायाशी कोण बसलं आहे?", असा सवाल राऊतांनी मोदींना केला.
"नरेंद्र मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. मला चिंता वाटते की, मोदींना भाषणं कोण लिहून देतात? मोदींना जी संस्था किंवा व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत, ते मोदींची बेअब्रू करत आहेत. मोदींची हास्य जत्रा करत आहेत. अशा प्रकारची भाषणं लिहून ते देशाच्या पंतप्रधानांची अब्रू घालवत आहेत. म्हणजे काल काय बोलले, त्याचा आज पत्ता नाही. आज काय बोलले उद्या पत्ता नाही", अशी टीका संजय राऊतांनी केली.