"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 08:19 PM2024-10-12T20:19:02+5:302024-10-12T20:22:54+5:30
Sanjay Raut Dasara Melava Speech: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना संजय राऊतांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.
Sanjay Raut Speech news: "उद्योगपती गेल्यावर देश हळहळत नाही. कारण त्यांना तो आपला वाटत नाही. पण, टाटा गेल्यावर देश हळहळला. कारण गेली अनेक शतकं टाटा म्हणजे विश्वास. विश्वासाचं दुसरं नाव टाटांबरोबर ठाकरे हे सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. टाटा आणि ठाकरे विश्वास म्हणून हा महाराष्ट्र, ही शिवसेना वादळात, संकटात ठाकरेंच्या मागे उभी राहिली आणि राहीन", असे म्हणत संजय राऊतांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य केले.
शिवाजी पार्क मैदानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "ही देवाची आळंदी आहे. चोरांची आळंदी आझाद मैदानावर भरली आहे. अरे नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम आहेत. त्या आझाद मैदानाची तरी थोडी लाज राखा. नावाची लाज राखा. गुलामांचा मेळावा आणि आझाद मैदानावर?"
"उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्राचं नेतृत्व द्यावं लागेल"
संजय राऊत म्हणाले, "हरयाणात जे घडलं, ते महाराष्ट्रात घडणार नाही. महाराष्ट्र वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. आज आम्ही इथे विचारांचं सोनं लुटायला जमलेलो आहोत. पण, काही लोक या राज्यामध्ये महाराष्ट्र लुटण्यासाठी एकत्र आलेले आहेत. ही लूट थांबवायची असेल, तर या राज्याची सूत्रं आपल्याला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यावी लागेल आणि महाराष्ट्र वाचवावा लागेल."
महायुती सरकारच्या कारभारावर टीका
"आज महाराष्ट्राचा कारभार कसा चाललेला आहे. महाराष्ट्राचा जो कारभार आहे, एका वाक्यात सांगायचं म्हणजे 'तर कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हागून भरला दरबार, अशी घाण या लोकांनी महाराष्ट्रात केली आहे. हा शब्द संसदीयच आहे. हागणदारी मुक्त गाव, ही सरकारची योजना आहे. तसं आपल्याला मंत्रालय हागणदारी मुक्त करायचं आहे", अशी टीका संजय राऊतांनी महायुती सरकारवर केली.