Sanjay Raut: “निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:58 AM2022-01-10T11:58:07+5:302022-01-10T11:58:53+5:30
Sanjay Raut: निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम (Election 2022) जाहीर केला आहे. यासह प्रचारसभा, कोणत्याही प्रकारच्या रॅलीला बंदी घालण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत तरी समान कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या सभा पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्षांनी घेतल्या. तिसऱ्या लाटेचा जोर दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात आकडे भयावह आहेत तर उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदच होत नाही. त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येत नाही. निवडणूक आयोगाने आरोग्य विभागाबरोबर चर्चा केल्याचे म्हटले आहे. पण हा काही उपाय नाही. निवडणुका वेळेत जाहीर केल्या आहेत, पण लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. अनेकदा निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. पण कोणाला तरी घाई झाली आहे पटकन निवडणुका घेण्याची, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.
आचारसंहितेच्या बाबतीत समान नागरी कायदा असायला हवा
पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठीक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी बोलत होते.
गोव्यामध्ये आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण...
गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की, ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.