संजय राऊतांचे हार्मोनियम वादन, राजेश टोपेंनी गायले गाणे; छत्रपती संभाजीराजेंचीही धमाल उत्तरं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 06:50 AM2021-08-01T06:50:12+5:302021-08-01T06:51:03+5:30
लोकमत यू ट्युबवर ‘फेस टू फेस’ नवीन कार्यक्रम, या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.
मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी उत्तम हार्मोनियम वादन केले, तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वत:च्या पत्नीसाठी सुंदर गाणे गाऊन दाखवले. लोकमत यू ट्युब चॅनल आणि लोकमत फेसबुकवर ‘फेस टू फेस’ हा नवीन कार्यक्रम दर आठवड्याला सुरू झाला आहे. ‘राजकीय व्यक्तींची अराजकीय मुलाखत’ असे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र आहे.
राजकारणात नावारूपाला आलेल्या व्यक्ती लहानपणी कशा होत्या, त्यांनी लहानपणी कोणत्या खोड्या केल्या, त्यांच्यावरील संस्कार, अशा विविध पैलूंचा शोध या कार्यक्रमातून लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतला आहे. या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.
आपले अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? शाळा कॉलेजमधील मित्र आता कुठे आहेत? ते संपर्कात आहेत की नाही? आपल्याला काय खायला आवडते? कोणते पदार्थ स्वतःला बनवायला आवडतात? या प्रश्नांची धमाल उत्तरे दिली आहेत, छत्रपती संभाजीराजे यांनी.
बाबा तुम्हाला त्या गोष्टी समजत नाहीत, असे मुलगी का म्हणाली? बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला काय सांगितले होते? महाविकास आघाडी सरकार कसे बनले आणि राज ठाकरे शिवसेना सोडून गेले, यापैकी कोणत्या विषयावर पुस्तक लिहायला आवडेल, हे सांगितले आहे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी.
शाळेपासून मी कसा विद्यार्थी होतो? राजकारणात आलो नसतो तर मी काय झालो असतो? आपल्या घराला पत्नीचे नाव का दिले? या प्रश्नांची उत्तरे देताना पत्नीसाठी गाणेदेखील गाऊन दाखवले, ते सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी.