Sanjay Raut : "महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 07:27 PM2021-03-23T19:27:59+5:302021-03-23T19:29:42+5:30
Sanjay Raut reaction on "Mahavikas Aghadi : राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे.
मुंबई - राज्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे. या काळात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर राहून विरोधकांचे मुद्दे खोडून काढत सरकारचा बचाव करत आहे. मात्र आज एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीबाबत धक्कादायक विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी ही राजकीय मजबुरीमधून जन्माला आली आहे. त्याला भाजपा कारणीभूत आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ("Mahavikas Aghadi is Shiv Sena's political compulsion", confessed Sanjay Raut)
महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य करणारी मुलाखत संजय राऊत यांनी दैनिक भास्कर या वृत्तपत्राला दिली आहे. त्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही राजकीय अपरिहार्यता आहे. हे भाजपामुळे घडले आहे. हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहे. मात्र आम्ही हिंदुत्वासोबत कुठलीही तडजोड केलेली नाही. तसेच आमचा हिंदुत्वाचा अजेंडाही बदललेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.
ॉयावेळी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेना परमबीर सिंग यांचं कौतुक करायची मात्र आता दोघेही आमने-सामने का आले आहेत, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांच्यावर सुशांत आणि कंगना प्रकरणामध्ये भाजपाने विश्वास ठेवला नव्हता. मात्र आता त्यांच्याच एका पत्राच्या बाजूने भाजपा गोंधळ घालत आहे. महाराष्ट्रात मोठे पोलीस दल आहे. यामध्ये एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरसाख्या छोट्या पदावरील व्यक्ती कसा काय मोहरा, असू शकतो असे सांगत राऊत यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे.
यावेळी यूपीएबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सोनिया गांधी ह्या दीर्घकाळापासून यूपीएचे नेतृत्व करत आहेत. मात्र आज यूपीए खूप कमकुवत झाली आहे. ती एवढी कमकुवत झाली आहे की भाजपासमोर उभी राहू शकत नाही आहे. यूपीएमध्ये आज खूप कमकुवत नेते आहेत आणि देशातील सर्व प्रादेशिक पक्ष ना काँग्रेससोबत जाऊ इच्छित आहेत ना भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत. देशात जेव्हा जेव्हा तिसरी आघाडी उभी राहिली आहे तेव्हा तेव्हा ती अपयशी ठरली आहे. त्यामुळे यूपीएला भक्कम बनवण्यासाठी काँग्रेसला मन मोठं करावं लागेल. यूपीएचे नेतृत्व अनुभवी नेत्याकडे असले पाहिजे. अशी व्यक्ती केवळ शरद पवार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.