Sanjay Raut: जातीच्या आधारावर आरक्षण नको, ही शिवसेनेची भूमिका; मराठा आरक्षणावर संजय राऊत म्हणाले...
By प्रविण मरगळे | Published: November 14, 2020 02:53 PM2020-11-14T14:53:31+5:302020-11-14T14:56:46+5:30
Sanjay Raut interview With Kunal Kamra News, Maratha Reservation: पोटाला जात आणि धर्म नसतो. जातीवाद संपवावा हे आम्हाला वाटतं, पण संपवणार कोण? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मुंबई - मराठा आरक्षणाचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे, सरकार त्यावर निर्णय घेईल, यावर बोलणं योग्य नाही, बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाची भूमिका होती जातीच्या आधारावर आरक्षण नको, कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा, आर्थिक निकषावर आरक्षण हवं ही शिवसेनेची भूमिका असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
कुणाल कामराच्या मुलाखतीत संजय राऊतांनीमराठा आरक्षणावर भाष्य केले, तेव्हा म्हणाले की, मुस्लिमांमध्ये कोणी मागासवर्गीय असेल त्यांनाही आरक्षण मिळायला हवं, मराठा समाजात कोणी मागास असेल तर त्यांना आरक्षण मिळायला हवं. इतकचं नव्हे तर दलितांमध्ये जे कोणी वर्षोनुवर्ष आरक्षण घेऊन उच्चपदावर पोहचलेत त्यांनी आरक्षण सोडायला हवं. पोटाला जात आणि धर्म नसतो. जातीवाद संपवावा हे आम्हाला वाटतं, पण संपवणार कोण? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम केलं नाही
कोरोना हे असं संकट आहे ज्याचा कोणी विचार केला नव्हता. ब्रिटीशांच्या काळात आपत्कालीन कायदा बनला होता तोच या संकटकाळात वापर होतोय, विरोधकांचा आवाज बंद करा, टीका करू नका हे कधीच बोलणार नाही, विरोधक १० टीका करतात त्यातील ३ गोष्टी खऱ्याच असतात त्याचा विचार करायला हवा. कोरोना काळात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम झालं, प्रत्येक जिल्ह्यात कोविड सेंटर, डॉक्टर्स सगळं सुरु आहे. एक मुख्यमंत्री आणखी काय करू शकतो. महाराष्ट्रात मृत्युदर कमी झाला, प्रत्येक राज्याने आपापल्या परिने काम केले, केंद्रावरही टीका करणार नाही. जेव्हा संकट असतं तेव्हा पंतप्रधान आमचे नेते असतात, तो जे निर्णय घेतील तो मान्य केला जातो अशा स्थितीत राजकीय विचार न करता काम केले पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.
त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंवर त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरेंचा प्रभाव होता, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या प्रेरणेनेच झाली, शिवसेनेचं नाव प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं आहे. बाळासाहेबांचे सगळ्यांशी चांगले संबंध होते. राजकारणात कोणी दुश्मन नाही, विचारधारा वेगळी असू शकते, शरद पवार आमच्याविरोधात होते, तरीही आम्ही भेटत होतो, संधी मिळेल तेव्हा सर्व राजकीय नेत्यांना मी भेटतो, देवेंद्र फडणवीस आमचे दुश्मन नाही, विरोधी पक्षनेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासोबत काम केले आहे, राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांना स्थान मिळेल, विरोध होत असतो पण तलवारी काढून विरोध होत नाही. मी पत्रकार आहे, संपादक आहे त्यामुळे मुलाखतीसाठीही मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो असा खुलासा संजय राऊत यांनी केला.
मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामं
अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी खूप महत्वाचं असतं, मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, स्टुडिओपण अनधिकृत आहेत, एक फिल्मी डायलॉग आहे “जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घरपर पत्थर नही फेका करते” त्यामुळे आमच्याकडे दगड(पत्थर) आहेत ते बाहेरून फेकू शकतो आणि आतमधूनही फेकू शकतो. जर तुम्ही काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, काही चुकीची काम लपवण्यासाठी गप्प बसावं,आमच्यावर दगडं फेकू नयेत, आम्ही तुम्हाला अनेकदा मदत केली आहे असा इशारा संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिला आहे.