"शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक, त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच’’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 11:19 AM2021-06-17T11:19:37+5:302021-06-17T11:20:21+5:30
Shiv Sena-BJP POlitics: काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे.
मुंबई - राम मंदिराच्या मुद्द्यावरून काल शिवसेना भवनासमोर भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेना भवनासमोर काल झालेल्या राड्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काल शिवसेना भवनावर चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला. शिवसेना भवन ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता काल मिळालेल्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपाला दिला.
राऊत पुढे म्हणाले की, राम मंदिर जमीन गैरव्यवहार प्रकरणात भाजपावर किंवा भाजपाच्या नेत्यांवर आरोप झालेले नाही. राम मंदिर ट्रस्ट ही स्वायत्त संस्था आहेत. अस्मितेचं प्रतीक असलेल्या वास्तूवर आरोप होत आहे. त्यावर आरोप होत असेल तर त्याबाबत प्रश्न विचारणे खुलासा मागणे हा गुन्हा आहे का? असा सवालही राऊत यांनी विचारला. तसेच जेव्हा कधी कुणी शिवसेना भवनाकडे डोळे वर करून पाहिले आहे, यापुढे जर शिवसेना भवनाकडे कुणी डोळे वर करून पाहिले तर असेच उत्तर दिले जाईल, असा इशारा, संजय राऊत यांनी दिला.
दरम्यान, दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले. शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी शिवसेना भवनापासून साधारण अर्धा किलोमीटरवरच या आंदोलकांना अडवले. त्यानंतर युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेले.