"संजय राऊतला लाज वाटली पाहिजे", प्रवीण दरेकर का भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 07:49 PM2024-09-08T19:49:56+5:302024-09-08T19:50:28+5:30
Maharashtra News : भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांनी अमित शाहांबद्दल केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला. मुस्लीम मतांसाठी असे विधान केले असल्याचे दरेकर म्हणाले.
Pravin Darekar Sanjay Raut : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत आहे. ते लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या दर्शन दौऱ्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली. त्यांनी केलेल्या या टीकेनंतर प्रवीण दरेकर यांनी एकेरी उल्लेख करत राऊतांना उत्तर दिले. त्यामुळे शाह मुंबई येण्याआधीच कलगीतुरा रंगला आहे.
प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, "संजय राऊतला लाज वाटली पाहिजे. खरं म्हणजे आमचे नेते अमित शाह, हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. तसेच ते उद्याही (9 सप्टेंबर) लालबागचा राजाच्या दर्शनाला येत आहेत. पण, अमितभाई मौजमस्ती करायला मुंबईत येत आहेत, असे घृणास्पद वक्तव्य करून संजय राऊतांनी लालबागच्या राजाच्या, आमच्या दैवताचा अपमान केला आहे."
"केवळ मुस्लीम मतांच्या लाचारीसाठी हिंदू विरोधी भूमिका घेण्याचे काम संजय राऊत करत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही", अशी टीका प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
संजय राऊतला लाज वाटली पाहिजे.
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 8, 2024
मुंबईत लालबाग गणपती दर्शनाला आमचे नेते मा. @AmitShah जी दरवर्षी येतात.
उद्याही ते लालबाग गणपती दर्शनाला जाणार आहेत.
मुंबईत मौज करायला ते येत आहेत, असे वक्तव्य करून संजय राऊत लालबागच्या राजाचा सुद्धा अपमान करीत आहेत.
उबाठा आता मतांसाठी संपूर्ण… pic.twitter.com/4ifUAoKEUL
संजय राऊत अमित शाहांबद्दल काय बोलले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, "लालबागचा राजाच्या दर्शनाला ते येत आहेत, येऊद्या. मला तर सारखी भीती वाटतेय की, ज्या प्रमाणे मुंबईतील उद्योग पळवले. अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे ते लालबागचा राजा तर गुजरातला नेणार नाहीत ना. ते काहीही करू शकतात."
"लालबागचा राजाचे मोठे नाव आहे. देशातून लोक येतात. चला गुजरातला घेऊन जाऊयात. असे होऊ शकते. लालबागचा राजा गुजरातला नेण्याचा प्रस्ताव ठेवतील. व्यापारी लोक आहेत. मी फार विचारपूर्वक बोलतोय. हे लोक महाराष्ट्राला शत्रू मानत आहेत. भाजपच्या अनेक लोकांना मुंबई लुटायची आहे", अशी टीका संजय राऊतांनी अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर केली.