"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:24 AM2024-09-30T11:24:53+5:302024-09-30T11:31:59+5:30
Sanjay Raut Eknath Shinde : नागपूरमधील उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत पलटवार केला. शिंदेंनी केलेल्या ट्विटला खासदार संजय राऊतांनी दिले.
Eknath Shinde Sanjay Raut : "काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते", अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीउद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण डागला. शिंदेंनी केलेल्या या टीकेला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले. शिंदेंना ट्विट करता येतं का? असा सवाल करत राऊतांनी शिंदेंना डिवचले.
माणसांना ट्रेनिंग द्या, राऊतांचा शिंदेंना सल्ला
संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) ट्विट करता येतं का स्वतःला? आम्ही ओळखतो त्यांना. ट्विट करायला जी माणसं ठेवली आहेत, त्यांना नीट ट्रेनिंग द्या. कटोरा घेऊन दिल्लीच्या दरबारात आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षापासून कोण आहे?", असा खोचक सवाल संजय राऊतांनी
"उद्धव ठाकरेंचं काय असेल, ते आम्ही पाहू. गुजरातच्या दरबारात अडीच वर्षापूर्वी मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? मोदी-शाहांची धुणी-भांडी करायला कोण गेलं, तुम्हीच गेला होतात मुख्यमंत्री पदासाठी! आणि आता सुद्धा दिल्लीमध्ये मोदी-शाहांच्या उंबरड्यावरचे पायपुसणे आहात", असे उत्तर राऊतांनी शिंदेंच्या टीकेला दिले.
महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्या इतकीही राहणार नाही -राऊत
संजय राऊत पुढे म्हणाले, "ज्या दिवशी मोदी-शाहांचा हात तुमच्या डोक्यावरून जाईल. त्यादिवशी तुमची किंमत महाराष्ट्रात कचऱ्या इतकीही राहणार नाही. हे ठाकरे घराणे आहे आणि या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही आज या पदावर पोहोचला आहात, मिस्टर शिंदे हे लक्षात घ्या."
पूर्वायुष्य विसरू नका, राऊत शिंदेंना काय म्हणाले?
"ठाकरेंवर बोलताना आपलं पूर्वायुष्य काय होतं, हे विसरू नका. हे वारंवार भाषणातून तुम्ही व्यक्त केलेलं आहे. आपण गुलाम आहात, गुजरातच्या व्यापार मंडळाचे. मी कालच म्हणालो की, हे लोक दसरा मेळावा घेणार, मुंबईत घेऊ नका. तुमची दसरा मेळाव्याची जागा कुठे आहे, सूरत. तिथे त्यांच्या शिवसेनेचा जन्म झाला. अडीच वर्षांपूर्वी", असा उपरोधिक सल्ला राऊतांनी शिंदेंना दिला.
"त्याच्या पक्षाला दोन-अडीच वर्ष झाली. दोन जागा आहेत, जिथे हे लोक दसरा मेळावा घेऊन शकतात. एक सूरत आणि दुसरी गुवाहाटी. कामाख्या मंदिरासमोर किंवा रेडिसन हॉटेल. जिथे हे लोक एक महिना बसलेले होते. सूरत सगळ्यात चांगले आहे", असे राऊत शिंदेंच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले.