सातापैकी एक फुटला अन् गावची सत्ता गेली; शेवटपर्यंत कळलंच नाही ‘तो’ फुटीर सदस्य कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 03:58 PM2021-03-02T15:58:45+5:302021-03-02T16:00:40+5:30
शिराळा तालुक्यातील अर्जुनवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या ७ नूतन सदस्यांनी राजीनामा दिला होता, परंतु सोमवारी हे राजीनामा माघारी घेतले
कोल्हापूर – अलीकडेच राज्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीत घडलेले काही किस्से तुम्हाला माहितीच असतील, एका विजयी पॅनेलने दिवसभरात ३ पक्ष बदलल्याचंही सोशल मीडियात व्हायरल झालं, मात्र आज कोल्हापूरातील एका गावात चक्क निवडून आलेल्या सात सदस्यांपैकी एक सदस्य फुटला अन् विरोधकांना जाऊन मिळाला. पण हा फुटीर सदस्य कोण याची शेवटपर्यंत माहिती कोणालाच लागली नाही.
शिराळा तालुक्यातील अर्जुनवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या ७ नूतन सदस्यांनी राजीनामा दिला होता, परंतु सोमवारी हे राजीनामा माघारी घेतले, राजीनामा माघारी घेतला असला तरी आघाडीच्या सदस्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. या गावात सरपंच निवडीवेळी सातपैकी एक सदस्य फुटीर निघाल्याने विकास आघाडीच्या हातची सत्ता गेली, यामुळे नाराज झालेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या ७ सदस्यांनी तात्काळ राजीनामा दिला.
अचानक सात सदस्यांनी राजीनामे दिल्याने गावात उलट सुलट राजकीय चर्चा सुरू होती, सदस्यांनी राजीनामा दिल्याने मतदारांचा अनादर झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष वाढत होता. तर तालुका गटप्रमुखांनी आदेश दिल्याने राजीनामे मागे घेत असल्याचं संतोष पाटील यांनी जाहीर केले. सातपैकी एकाने फुटून विरोधकांना मतदान केले, ते शोधून काढण्यासाठी राजीनामा नाट्याचा अवलंब केल्याची चर्चा सुरू होती, मात्र सातही जणांनी राजीनामा दिल्याने नेमका कोण फुटला हे कळू शकले नाही.
निवडून आलेल्या सदस्यांनी राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकत नसल्याने, अखेर त्या सात सदस्यांनी राजीनामा माघार घेतल्याची चर्चा सुरू होती, तर सत्ताधारी आणि विरोधी यापुढे काय भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलं आहे.
नेमका फुटीर कोण, याची चर्चा
सरपंच पदासाठी मतदान झाल्याने सातपैकी एक सदस्य फुटला, या कारणामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या हातून सत्ता गेली, पण तो फुटीर सदस्य कोण? हे शोधण्यासाठी राजीनामा सत्र यासह परीक्षा घेतल्या असून, सर्वांनी त्या परीक्षा दिल्यामुळे नेमका फुटीर कोण? हे मात्र शेवटपर्यंत कोणलाच कळालं नाही.