मोठ्या मालकांसाठी प्रार्थना करा! भाजपाच्या जेष्ठ नेत्याला कोरोनाची लागण; नातवाची भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 05:08 PM2020-08-17T17:08:40+5:302020-08-17T19:51:57+5:30
गेली ५० वर्षे सुधाकर परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात आपला राजकीय ठसा उमटवला आहे.
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक राजकीय नेते मंडळींनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता यात सोलापूरातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील एका रुग्णालयात सुधाकर परिचारक यांच्यावर उपचार सुरु आहेत.
गेली ५० वर्षे सुधाकर परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात आपला राजकीय ठसा उमटवला आहे. सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या प्रार्थनेची गरज असल्याचं त्यांचा नातू प्रितीश परिचारक यांनी आवाहन केले आहे. सध्या सुधाकर परिचारक यांचे वय ८५ आहे. त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुधाकर परिचारक यांच्या तब्येतीबद्दल त्यांचा नातू प्रितीशने फेसबुकवर पोस्ट केले आहे.
काय आहे फेसबुक पोस्टमध्ये?
गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास COVID विलगिकरण वॉर्डसमध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.
आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यांमुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे. गेली ५० वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाई ही जिंकतील अशी आशा करूयात.
वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.
धन्यवाद.
कोण आहेत सुधाकर परिचालक?
सुधाकर परिचारक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते त्यानंतर त्यांनी आणि त्यांचा पुतण्या प्रशांत परिचारक यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. सुधाकर परिचालक हे एसटी महामंडळाचे अध्यक्षही होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परिचालक हे महायुतीकडून उभे राहिले होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सलग २० वर्ष सुधाकर परिचारक यांनी पंढरपूरचं प्रतिनिधित्व केले होते.