शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख कालवश, ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:55 AM2021-07-31T06:55:50+5:302021-07-31T06:59:50+5:30

Ganapatrao Deshmukh: १० ऑगस्ट १९२७ रोजी मोहोळ तालुक्यातील पिंपरी येथे जन्मलेल्या देशमुख यांनी  ‘एक झेंडा, एक पक्ष आणि एक मतदारसंघ’ घेऊन विधानसभेत ५४ वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

Senior leader Ganapatrao Deshmukh Passed away, holds the record of becoming MLA 11 times | शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख कालवश, ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख कालवश, ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम

Next

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम केलेले सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (९४) यांनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. साधी राहणी आणि राज्यभरातील उपेक्षित घटकांबद्दलच्या विकासाबद्दल सतत आग्रही असणारे भाई देशमुख उभ्या महाराष्ट्रात आबासाहेब म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सांगाेला येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम देशमुख यांनी मोडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून त्यांनी तब्बल ११ वेळा विक्रमी मतांनी विजय मिळविला. तब्बल ५४ वर्षे त्यांनी सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले.
१० ऑगस्ट १९२७ रोजी मोहोळ तालुक्यातील पिंपरी येथे जन्मलेल्या देशमुख यांनी  ‘एक झेंडा, एक पक्ष आणि एक मतदारसंघ’ घेऊन विधानसभेत ५४ वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात सातत्याने निवडून आले. १९७८ ते १९८० साली ते राज्याचे कृषी, ग्रामविकास, न्याय खात्याचे मंत्री होते. त्यानंतर १९९९ ते २००२ या कालावधीत पणन रोजगार, हमी या खात्याचे मंत्री होते. मार्च १९९०, नोव्हेंबर २००४, नोव्हेंबर २००९ साली त्यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
काही वेळा आक्रमक तर काही वेळा सौम्य भूमिका घेऊन गरीब, कामगार, मोलमजूर, शेतकरी यांचे प्रश्न घेऊन त्यांंनी लढा उभारला. दुष्काळी सांगोला तालुक्यात फळबागा आणि इतर पिकांचा लागवडीचा कार्यक्रम त्यांनी राबवला. यामुळे सांगोला तालुक्याचा कायापालट झाला. देशमुख यांच्यावर गेल्या आठवड्यापासून सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी पोटाशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

 चालते बोलते विद्यापीठ गमावले 
राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजताच अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे. 
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते. आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील. 
 - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

 विचारांशी कधी प्रतारणा केली नाही 
नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. त्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला. इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा 

कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद व क्लेशदायक आहे. राज्याच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी विरळा म्हणावा लागेल. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया त्यांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्य व कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे.     
    - शरद पवार, 
    अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीने निस्वार्थी भावनेने कसे काम करावे तसेच तत्वांशी तडजोड न करता राजकारणात राहता येते, हा एक वेगळा आदर्श मा. गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्राला दाखवला.
- प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद  

 

Read in English

Web Title: Senior leader Ganapatrao Deshmukh Passed away, holds the record of becoming MLA 11 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.