शहा-पवार, ठाकरे-मोदी भेटींमागे दडलंय काय? संजय राऊत म्हणाले, मी ठामपणे सांगू शकतो की...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 03:19 PM2021-06-29T15:19:17+5:302021-06-29T15:21:54+5:30
उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना नरेंद्र भाईच म्हणतात; त्यांच्यातील वैयक्तिक संबंध उत्तम- संजय राऊत
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मतभेद असू शकतात. मात्र त्याचा अर्थ नाराजी आहे असा होत नाही. दोन वर्षांत तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना उत्तम काम केलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. त्यावर त्यांच्या मनासारखं काही घडत नसल्यानं तेच नाराज आहेत. राज्य कारभार सुरळीत चालावा यासाठी विरोधकांचं सहकार्य अपेक्षित असतं. मात्र विरोधकांची भूमिका तशी नाही. त्यांचे नेते संन्यास घेण्याची भाषा करतात. हे खरंतर त्यांच्या पक्षांचं वैफल्य आहे. त्यांनी सरकारसोबत काम केलं तर लोक त्यांना दुवा देतील. त्यांचं काम लक्षात ठेवतील, असं राऊत म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत वारंवार मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत. त्याबद्दल विचारलं असता, 'उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यासोबतच ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. मी पक्षाचा खासदार असल्यानं त्यांच्या भेटीला जातो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घ्यायला मला आवडतं. त्यांच्याकडून विविध विषयांची माहिती घ्यायला मला आवडतं. त्यामुळे मी त्यांची भेट घेतो. इतरांनीदेखील त्यांची भेट घ्यायला हवी,' असं राऊत यांनी म्हटलं.
अमित शहा आणि शरद पवारांची गुप्त भेट, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंची दिल्लीतील व्यक्तीगत भेट याबद्दल विचारलं असता, या भेटींमधून वेगळे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मोदी आणि ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत. काही नाती व्यक्तीगत असतात. राजकारणाशी त्यांचा संबंध नसतो. उद्धव ठाकरे आजही मोदींना नरेंद्र भाईच मानतात. ते त्यांना नरेंद्र भाईच म्हणतात. त्यामुळे त्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार आणि अमित शहांची भेट झाल्याचं त्यांच्या पक्षानं नाकारलं आहे. त्याबद्दल तुम्हालाच जास्त माहिती दिसते, असं राऊत म्हणाले.