"पाच वर्षं कुठलं; हे सरकार पुढचं वर्षभरही टिकणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 06:45 AM2020-07-04T06:45:00+5:302020-07-04T10:51:09+5:30
लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.
मुंबई – राज्यात भाजपा चांगले सरकार देऊ शकते, महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही, भाजपा सरळ मार्गाने सत्तेवर यायला तयार आहे. या सरकारमध्ये अंतर्गत इतके वाद आहेत की सरकार एक वर्ष तरी चालेल का? याची शंका आहे. तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत वाद आहेत. कोणाचं कोणाला पटत नाही असं सांगत भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर प्रहार केला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. मुंबईत ४ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे, याला जबाबदार कोण? रोज नवीन आदेश काढले जात आहेत पण अंमलबजावणी होताना दिसत नाही, महाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीत. बेजबाबदारपणे सरकार वागत आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच राज्यातील जनता सुरक्षित नाही, देशात सर्वाधिक भयंकर परिस्थिती राज्यात आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. रुग्णांची अवस्था काय आहे? ना औषध ना उपचार ना काही, सरकारमध्ये कोरोनावर मात करण्याची क्षमता नाही, लोकांचे व्यवहार बंद आहेत, लोक त्रस्त झालेत, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय? घरात बसून सरकार चालवता येतं का? सरकारी यंत्रणेवर कोणताही अंकुश नाही, सपशेल अपयशी ठरलं आहे. लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.
शरद पवार काहीही घडवू शकतात...
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावरुन प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, शरद पवार प्रस्ताव देतात ते एकाच पक्षाला देतात यावर विश्वास कितपत ठेवावा, हे विचार करावं असा सल्ला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. जे झालं ते झालं त्याला इतिहास साक्ष आहे, पवारांकडून राजकीय आणि सरकारबद्दल प्रस्ताव येतात ते आपल्यालाच दिला असेल असं विश्वास ठेऊन पुढे जाऊ नये असं मला वाटतं. चीनच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी राष्ट्रीय भावनेतून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला असेल, त्यांचे विधान काँग्रेसला एकाकी पाडण्याबाबत नसावं, पण शरद पवार काहीही घडवू शकतात असं सूचक विधान नारायण राणे यांनी केलं आहे.