पानांवर नजरही न टाकता शरद पवार हे विलासरावांबद्दल भरभरून लिहू शकले असते, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:01 AM2021-08-01T07:01:43+5:302021-08-01T07:02:28+5:30
लोकनेते, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी आमदार ते मुख्यमंत्री या कारकिर्दीत विधिमंडळात केलेल्या भाषणांचा ‘दिलखुलास’ हा अप्रतिम ग्रंथ सध्या तयार होतोय.
सुप्रियाताई फोटोग्राफर होतात तेव्हा...
राजकारणात दररोज नानाविध किस्से घडत असतात. आरोप-प्रत्यारोपही विनोदाचा भाग झाला आहे. काही किस्से ऐकून एखाद्या नेत्याबद्दल मनात चांगली भावनाही निर्माण होऊ शकते. काहीच दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी कमळ बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाताला बांधले, तर सुनील दहेगावकर यांना पक्ष प्रवेशाच्या वेळी दिग्गजांमध्ये एन्ट्री नव्हती.
आता छायाचित्र कोण काढणार हे पाहून हा कार्यकर्ता अस्वस्थ झाला. स्वत: आत जाण्याचा प्रयत्न करताच पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे त्यांना भेटल्या. ताई मला फोटो घ्यायचा आहे, असे म्हणताच तुमचा मोबाइल माझ्याकडे द्या. मी फोटो घेते म्हणत ताई मोबाइल घेऊन आत गेल्या. त्यांनी वेगवेगळ्या अँगलने छायाचित्र घेतले. मात्र संबंधित छायाचित्रांत ताई नसल्याची खंत त्या कार्यकर्त्यालाही आहे.
पंकजाताईंना सेना प्रवेशासाठी गुलाबभाऊंची साद
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे मुंडे समर्थकांनी थेट राजीनामा सत्र सुरू केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांना राजीनामे मागे घेण्याचे आवाहन केले, मात्र पंकजाताईंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
मुंडे परिवाराचा असलेला प्रभाव लक्षात घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट पंकजाताईंना शिवसेनेत प्रवेश येण्यासाठी साद घातली आहे. पंकजाताई यांचा शिवसेनेमध्ये योग्य तो सन्मान होईल, असे त्यांनी सांगितले. गुलाबभाऊंनी शिवसेना प्रवेशासाठी पंकजाताईंना दिलेल्या सादेला त्या कसा प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागून आहे.
विलासराव, उल्हासदादा अन् पवार यांची प्रस्तावना
लोकनेते, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी आमदार ते मुख्यमंत्री या कारकिर्दीत विधिमंडळात केलेल्या भाषणांचा ‘दिलखुलास’ हा अप्रतिम ग्रंथ सध्या तयार होतोय. ग्रंथाचे प्रमुख संपादक आहेत, विलासरावांचे निकटवर्ती उल्हासदादा पवार. सध्या ते आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने त्यावर जीव ओतून काम करताहेत. या ग्रंथाला प्रस्तावना आहे,
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची. उल्हासदादा परवा विधान भवनात भारावून सांगत होते, ‘प्रस्तावना मागायला मी पवार साहेबांकडे गेलो. साहेब म्हणाले, प्रस्तावना देतो; पण आधी ग्रंथाची पानं नजरेखालून घालू द्या. उल्हासदादा म्हणाले, सातशे पानं आहेत. पवार साहेब म्हणाले, चालेल तरी आणा. पवार साहेबांनी ती सगळी पानं चाळली अन् मगच प्रस्तावना दिली. या पानांवर नजरही न टाकता पवार हे विलासरावांबद्दल भरभरून लिहू शकले असते; पण त्यांनी तसे केले नाही. पवार हे पवार का आहेत, त्याचं हे एक उदाहरण.
(या सदरासाठी यदु जोशी, राजेश भोजेकर, विलास बारी लेखन केले आहे. श्रेयनामावली मजकुराच्या क्रमानुसार असेलच असे नाही.)