"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 10:36 AM2024-09-28T10:36:05+5:302024-09-28T10:39:29+5:30
Sunil Tingre Sharad Pawar : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आले होते. विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी टिंगरेंनी मदत केल्याचे आरोप झाले. या प्रकरणावरुन आता शरद पवारांनी टिंगरेंना फैलावर घेतले.
Sharad pawar Sunil Tingre : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून आमदार सुनील टिंगरे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अपघातानंतर सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. इतकंच नाही, तर 'तू सोडून गेला ते ठिक आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू', असा इशारा शरद पवारांनी दिल्याने टिंगरेंना विधानसभा निवडणूक जड जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील खराडी येथे एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरे यांना फैलावर घेतले. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने एका दुचाकीला धडक दिली. यात एक तरुण आणि तरुणी ठार झाले. या घटनेनंतर आमदार सुनील टिंगरे विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते, असे सांगितले जाते.
आमदार सुनील टिंगरेंनी आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात केला. त्यामुळे आमदार टिंगरे हे अडचणीत आले आहेत.
शरद पवार आमदार सुनील टिंगरेंबद्दल काय म्हणाले?
खराडीत बोलताना शरद पवार म्हणाले, "सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आला? हा पक्ष कोणी काढला, सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली. तू सोडून गेला, ते ठीक आहे; निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू", असा इशारा शरद पवारांनी सुनील टिंगरेंना दिला.
शरद पवार पुढे म्हणाले, "दोन तरुण मुलांना त्यांनी उडवलं काय, जागच्या जागी त्यांची हत्या काय होते; अशा वेळी जे जखमी झाले, त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती का?", असा संतप्त सवाल पवारांनी टिंगरेंना केला.
"मते राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. शरद पवारांच्या नावाने मते मागितली. आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केले, त्याचं उत्तरदायित्व या पद्धतीने केलं?", अशा शब्दात शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरेंना लक्ष्य केले.