"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 09:15 PM2024-10-16T21:15:36+5:302024-10-16T21:21:33+5:30
Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूर येथे पार पडली. यावेळी एका कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या नावाने घोषणा दिल्या. त्याला जयंत पाटलांनी तंबी दिली.
Jayant Patil Breaking News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राज्यभर प्रचाराची सुरूवात केली. या यात्रेची सांगता इस्लामपूरमध्ये बुधवारी (१६ ऑक्टोबर) झाली. या सभेत जयंत पाटील भाषण करायला उठल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यानंतर जयंत पाटील पाटलांनी त्याला तंबी दिली. यावेळी जयंत पाटील जे बोलले ते ऐकून शरद पवारांसह सगळेच खळखळून हसले.
जयंत पाटील कार्यक्रमात बोलायला उठले. यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या नावाने मुख्यमंत्री पदाच्या घोषणा दिल्या. त्या ऐकल्यानंतर जयंत पाटलांनी त्यांना गप्प बसा, असे सांगितले.
"घोषणा देऊन मुख्यमंत्री होता येत नाही, लय..."
घोषणा देणाऱ्यांकडे इशारा करत जयंत पाटील म्हणाले, "अय आता गप्प बस. मी त्याच्यावर भाषण करतो. अशा घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही. त्याला लय उठाबशा काढाव्या लागतात. तुम्ही गप्प बसा आता...", असे म्हणताच जयंत पाटलांना हसू अनावर झालं. त्यानंतर शरद पवारांसह व्यासपीठावरील नेते आणि सभेला आलेले सगळे खळखळून हसले.
या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, "पक्ष सोडताना अनेकजण आमच्यातून जात होते. मी सगळ्यांना सांगत होतो जाऊ नका. घोटाळा होईल. काही कुणी ऐकलं नाही. त्यांच्याकडची माहिती द्यायचे."
मी म्हणालो माझ्याकडे शरद पवार आहे
"दीवार सिनेमात अमिताभ बच्चन शशी कपूरला सांगतो, 'मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स है. तुम्हारे पास क्या है?' शशी कपूर शांतपणे म्हणतो 'मेरे पास माँ है.' त्यानंतर दोन मिनिटात अमिताभ बच्चनचा चेहरा खर्रकन पडतो. ते (अजित पवारांसोबत गेलेले नेते) मला सांगायचे हे आहे, ते आहे. जयंतराव तुम्हाला माहिती नाही. तुम्ही चूक करताय. सत्तेशिवाय काही नसतं. बाकी गोष्टी होतील, तुमच्यासाठी पद राखून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे काही राहिलेलं नाही. सगळा पक्षच मोकळा होतोय. त्यावेळी मी त्यांना (अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना) सांगितलं की, माझ्याकडे शरद पवार आहे. हा नेता असा आहे की, शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद असणारा नेता आहे", असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांसोबत गेलेल्यांना लक्ष्य केले.