शरद पवार : कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 06:57 PM2020-12-12T18:57:32+5:302020-12-12T18:58:39+5:30
Sharad Pawar Birthday : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एकदा मला म्हणाले, कृषी क्षेत्रातील कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास मी आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतरच तो जाहीर करतो. अलीकडचे चित्र बदलले. पवारानंतर कोणी कृषिमंत्रीपदाची प्रतिष्ठा टिकवू शकले नाहीत.
- राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार)
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एकदा मला म्हणाले, कृषी क्षेत्रातील कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास मी आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतरच तो जाहीर करतो. अलीकडचे चित्र बदलले. पवारानंतर कोणी कृषिमंत्रीपदाची प्रतिष्ठा टिकवू शकले नाहीत. शेती हा पवारांचा मूलत: आवडीचा विषय. त्यामुळेच ते या क्षेत्रात आमूलाग्र बदल करू शकले. शेतीला पूरक असलेल्या डेअरी किंवा अन्य विभागात पवारांचे खूप मोठे योगदान आहे. देशहितासाठी २४ बाय ७ राजकारण करणारा हा नेता आहे.
मी पवार यांच्यासह पहिल्यांदा महाराष्ट्रात हेलिकॉप्टर दौऱ्यावर गेलो १९९० मध्ये! ते हेलिकॉप्टरमधून मला या गावातील कोण सरपंच आहे, जिल्हा परिषदेचा कोण अध्यक्ष आहे, हे सांगत होते. इतकी महाराष्ट्रात त्यांची पकड होती व आहे. मला ते म्हणाले, मी हेलिकॉप्टरचा, अॅम्बेसेडर गाडीचा नेता आहे. ३० वर्षांनंतर २०१९ मध्ये मी पुन्हा त्यांच्यासह दौऱ्यावर गेलो. फरक एवढाच आहे, आता माझे केस पांढरे झालेत. साताऱ्याला सभा होती. आम्ही सभा बघत होतो. पाऊस खूप पडत होता. कॅमेरामन म्हणाला, या पावसात शूटिंग कसे करायचे? आयोजकांनी सभा रद्द करू, असे सांगितले, परंतु पवार म्हणाले, नाही. लोक आले आहेत. खूप पाऊस असल्याने चिंब भिजतच ते सभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीतले महाराष्ट्राच्या इतिहासातील असे दृश्य अपवादात्मक असावे.
रात्री १२ वाजता असो की, सकाळी ६ वाजता पवारांचा फोन येतो आणि एखाद्या विषयावर सखोल चर्चा करतात. एखादी बातमी चुकली, तर ते निदर्शनास आणून देतात आणि मैत्रीही जपतात. पवारसाहेबांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो ही मन:पूर्वक प्रार्थना.
टीका केली तरी मनात ठेवत नाहीत
अलीकडे पत्रकारांशी मनमोकळे बोलणारे नेते नाहीत. आम्ही कितीदा तरी त्यांच्यावर टीका केली, परंतु ते मनात ठेवत नाहीत. लगेच दुसऱ्या दिवशी बोलायला तयार असतात. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसच मुख्यंमत्री होतील, राष्ट्रवादी संपल्यात जमा आहे, असे माध्यमांमध्ये येत होत, परंतु त्यांनी ही बाब मनाला लावून घेतली नाही.