चिकाटी आणि संघर्ष..! देशाला एक नवीन दिशा दाखविणारा नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:50 PM2020-12-12T17:50:25+5:302020-12-12T17:53:42+5:30
Sharad Pawar birthday : शरद पवार यांनी कितीतरी क्षेत्रांत मौल्यवान योगदान दिले. राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री अशा कितीतरी जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळल्या आणि महाराष्ट्राला, देशाला एक नवीन दिशा दाखविण्याचे काम केले.
- देवेंद्र फडणवीस
(विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री)
शरद पवार यांनी कितीतरी क्षेत्रांत मौल्यवान योगदान दिले. राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री अशा कितीतरी जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळल्या आणि महाराष्ट्राला, देशाला एक नवीन दिशा दाखविण्याचे काम केले. राजकारणाशिवाय, क्रीडा, शिक्षणसंस्था, साखर संस्था, शेतीविषयक संस्था अशा अनेक क्षेत्रांत मुलभूत काम उभे करण्यासाठी त्यांनी प्रचंड योगदान दिले. यातून राजकारणाच्या परिघाबाहेर स्वत:ची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली.
पवार यांचा सर्वांत महत्त्वाचा गुण मला जाणवतो तो म्हणजे कोणत्याही गोष्टीचा साकल्याने अभ्यास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा. पवार तरुण होते, तेव्हा युनोस्कोच्या शिष्यवृत्तीतून त्यांनी अनेक देशांमध्ये प्रवास केल्याचे वाचनात आले. तेथील राजकीय पक्षांचा, संघटनात्मक बांधणीचा अभ्यास केला, त्याचा लाभही त्यांना झाला. सत्तेत असो की विरोधी पक्षात, एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.
मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी अनेकदा भेटी होत. ते कधीही एकटे येत नसत, त्यांच्या हातात निवेदनांचे गठ्ठे असत. त्यातील प्रत्येक कागद त्यांनी वाचलेला असायचा. त्यामुळे समस्या मांडताना त्याचे समाधान कसे करता येऊ शकते, याचे उत्तरही तयार असायचे. त्यामुळे प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने नेमका मार्ग काढणे सोपे जायचे. कुठला कागद प्रशासकीय यंत्रणेत कुठे अडला आहे आणि तो पुढे जात नसेल तर कारणे काय, याच्या नोंदी ठेवण्याची त्यांची सवय. त्यामुळे पाठपुरावा करणेही सोपे जायचे.
त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते वस्तुस्थितीला धरून विचार करतात. गतिमान निर्णयप्रक्रिया हा त्यांचा स्वभावच आहे. फार काळ एखाद्या विषयात गुंतून राहणे, हे त्यांना रुचत नाही. ठाम निर्णय व पुढे त्या निर्णयाचा आदर करतानाच आपण त्यांना पाहिले आहे. त्यांनी विचारवंत, साहित्य वर्तुळ, क्रीडा संस्था यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले, ते अष्टपैलू म्हणून नावारूपास आले.
समाजमाध्यमांवर त्यांची एक चित्रफीत मी पाहिली. त्यात तुम्हाला एकच मुलगी आहे. मुलगा व्हावा, असे वाटले नाही का, असा प्रश्न पवार यांना विचारला गेला. उत्तरात त्यांनी अग्नी देण्यासाठी मुलाची चिंता करायची की जिवंत असताना नीटनेटका सांभाळ करण्याचा विचार करायचा, हा प्रश्न उपस्थित केला. वास्तववादी विचार, आपण स्वत: जर कुटुंब नियोजनाचा आग्रह धरत असू, तर त्याचा पुढाकार स्वत:पासून का करू नये, हा विचार मला फार महत्त्वाचा वाटतो.
शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वावर ‘इनफायनाइट पवार’ प्रसिद्ध करण्याचा दै. लोकमतचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. मला खात्री आहे की, पवारसाहेबांच्या जीवनातील अनेक संदर्भ येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील आणि त्याचा समावेश या अंकात असेल.
पवार साहेबांना अनेक शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची कामना करतो.
प्रेरणादायी
कायम कार्यरत राहणे आणि कायम संघर्ष करीत राहणे हे पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे, जीवनाचे दोन अतिशय महत्त्वाचे पैलू म्हटले पाहिजेत. एका सहकारी सोसायटीच्या सचिवपदापासून, देशातील आघाडीच्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक हा त्यांचा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अगदी तरुण वयापासून ते वयाच्या ८०व्या वर्षांपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास अतिशय उल्लेखनीय आहे.
आत्मनिर्भर जगणे शिकण्यासारखे
अनेक माणसं मोठी होतात. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. अर्थात, त्याला शिस्तीची साथ मिळाली की अजून उंच झेप घेता येते. जेव्हा एखादी व्यक्ती मोठमोठे पल्ले गाठत असते, तेव्हा त्याचे परावलंबित्वही वाढत जाते, पण विषयांची नोंद व त्याचा पाठपुरावा याबाबत परावलंबित्व नसले की काय होते, हे पवारसाहेबांच्या आयुष्यातून शिकण्यासारखे आहे.
इनफायनाइट आणि इन्सिट्युशनलही
पवार जसे ‘इनफायनाइट’ आहेत, तसे ते ‘इन्स्टिट्युशनल’ही आहेत. शेतीतील मातीपासून ते बाजारापर्यंतच्या स्थितीची उत्तम जाण असलेले ते नेतृत्व आहे. शेती सुधारणांसाठी त्यांचा पुढाकार अतिशय लक्षणीय होता. त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनातील नेतृत्व कौशल्याचा अनुभव भारताने किल्लारी भूकंपाच्या हाताळणीतून घेतला. स्व. अटलजींनीही त्यांना २००१ मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. त्यांच्या प्रदीर्घ जीवनकार्याचा यथार्थ गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन केला.