सुप्रिया सुळें'साठी शरद पवारांचीही हर्षवर्धन पाटील यांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 09:30 PM2019-04-02T21:30:49+5:302019-04-02T21:33:23+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना साद घातली आहे. मात्र त्याबदल्यात पाटील यांनी इंदापूर, भोर आणि पुरंदरची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठीची इच्छा बोलावून दाखवली आहे.
पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना साद घातली आहे. मात्र त्याबदल्यात पाटील यांनी इंदापूर, भोर आणि पुरंदरची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठीची इच्छा बोलावून दाखवली आहे.
चार दिवसांपूर्वी अजित पवार यांनीही पुण्यात पाटील यांच्या निवासस्थानी 'डिनर डिप्लोमसी' करत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पवार आणि पाटील यांच्यातील बैठकीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. २०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीने पुरंदरमध्ये संजय जगताप आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा केलेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटेदेखील खूप प्रयत्नांनी निवडून आले होते. हे तीनही मतदारसंघ बारामतीमध्ये येत असल्याने तिथून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या मताधिक्यासाठी पाटील यांची गरज आहे. दुसरीकडे भाजपने कांचन कुल यांच्या रूपाने सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात कुल कमळावर लढणार असल्याने त्यांना खड़कवासल्यातून फायदा होण्याची चिन्हे आहेत. त्यांचे बारामती तालुक्यात नातेसंबंध असल्यामुळे तिथेही सुळे यांना मतांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशावेळी पुरंदर, भोर आणि इंदापूरची मते सुळे यांच्याकरीता महत्वाची ठरणार आहे. म्हणून मागील निवडणुकीत दुखावलेल्या पाटील यांची समजूत काढण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. सोमवारी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांच्यासह अजित पवार यांनीही ऍक्टिव्ह होत सहभाग घेतल्याने 'पाटील-पवार' दिलजमाई झाल्याची चर्चा आघाडीत रंगत आहे.