शरद पवार : माझे बंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 06:48 PM2020-12-12T18:48:11+5:302020-12-12T18:48:49+5:30
Sharad Pawar Birthday : आम्ही चार बहिणी व सात भाऊ अशी अकरा भावंडे. शरद पवार माझ्यापेक्षा वर्षाने लहान. पाठचा भाऊ म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात जास्तच आपलेपण. महाराष्ट्राला व देशाला शरद पवार माहितीचे आहेत. आमचे अन्य भाऊही तितक्याच तोलामोलाचे.
- सरोज पाटील
(शरद पवार यांच्या भगिनी आणि शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या पत्नी)
आम्ही चार बहिणी व सात भाऊ अशी अकरा भावंडे. शरद पवार माझ्यापेक्षा वर्षाने लहान. पाठचा भाऊ म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात जास्तच आपलेपण. महाराष्ट्राला व देशाला शरद पवार माहितीचे आहेत. आमचे अन्य भाऊही तितक्याच तोलामोलाचे. सगळ्यांत थोरले वसंतराव पवार उत्तम वकील होते. ते शेकापचे काम करायचे. आप्पासाहेब त्याकाळी बी. एससी. झाले होते. कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले होते. अनंतराव उमदे, हरहुन्नरी, उत्तम व्यंगचित्रकार आणि गायक. माधवराव उद्योजक होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सूर्यकांत लंडनला स्थायिक झाले. ते प्रख्यात आर्किटेक्ट होते. त्यांनी पाच कोटींची संपत्ती प्रतिवर्षी एक कोटी, याप्रमाणे चांगल्या सामाजिक संस्थांना वाटली. त्यांच्यानंतर शरद पवार व शेवटचे प्रतापराव पवार. बहिणींपैकी मी व मीना जगधने ‘रयत’च्या माध्यमातून सामाजिक कार्यात आहे.
आमचे अन्य भाऊ शाळेत हुशार होते, परंतु शरद पवार कधी फारसे अभ्यासात रमले नाहीत. आमची आई टांगा चालवत बारामतीहून काटेवाडीला जाऊन शेती करायची. त्यामुळे आईचा टांगा आला की, आम्ही भावंडे पुस्तके घेऊन अभ्यासात गढून जात असू, परंतु शरद यांचा पाय कधी थाऱ्याला नसे. उंची ताडमाड होती. प्रकृती त्यावेळी शिडशिडीत होती. कायम वीस-पंचवीस तरुणांचे टोळके त्यांच्यासोबत असे. ‘हे पोरगं वाया जाणार’ असे सर्वांना वाटायचे. याचे काही खरे नाही, असे आम्हाला वाटत असे, पण त्यांचे अवांतर वाचन होते. शाळेचे गॅदरिंग, क्रीडा महोत्सव वा कोणताही कार्यक्रम असो. त्याचे पुढारीपण त्यांच्याकडेच असे. मला आजही चांगले आठवते की, शाळेचे शिक्षक ‘शरद पवार, तुम्ही ताबडतोब स्टेजकडे या,’ असे माइकवरून पुकारायचे. उत्तम संघटन, प्रचंड जनसंपर्क, एकदा सान्निध्यात आलेल्या व्यक्तीला कधी विसरणार नाही, हे गुण त्यांच्यात कळत्या वयापासूनच होते. वसंतराव पवार यांनी शरद यांच्यातील गुण हेरले होते. ते कायम शरद पवार बाहेरून आले की त्यांना ‘राजे, कुठं गेला होता?’ असे विचारायचे. पवार जसे सामाजिक कामांत सक्रिय होते, तसे कुटुंबातही अनेक जबाबदाऱ्या पार पाडत. बहिणींच्या लग्नातील सगळ्या जोडण्या तेच लावत. काटेवाडीतील शेतातील भाजीपाला घेऊन ते बाजाराच्या गावांत जाऊन विकत. दुधाचे रतीबही घालायचे. म्हणजे दौंडच्या बाजारात स्वत: पिकवलेला भाजीपाला विकणारा मुलगा पुढे देशाचा कृषिमंत्री झाला.
दवाखान्यात डबा पोहोचविण्यापर्यंतचा आधार प्रतिभा वहिनींनी दिला आहे. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हातालाही कधी त्यांनी कळू दिली नाही. राजकीय भूमिका भिन्न असल्या, तरी एन. डी. पाटील व शरद पवार यांचे अंतिम उद्दिष्ट गोरगरिबांचे कल्याण हेच राहिले. आमचे वडील संतांसारखे होते. आई अत्यंत करारी होती. तिने आम्हा भावंडांना उत्तम पद्धतीने वाढविले, चांगले संस्कार केले. बहीण-भाऊ असा कधीच भेदभाव केला नाही. शरद पवार देशात प्रथम महिला धोरण राबवू शकले, एका मुलीवर थांबण्याचा निर्णय घेऊ शकले, त्यामागे आईने त्यांच्यावर केलेले हे संस्कारच कारणीभूत आहेत.
पवार कुटुंबीय म्हणून आमची बहीण-भावातील प्रेमाची, आपुलकीची, मायेची वीण अजूनही तितकीच घट्ट आहे. आजही दिवाळीला शरद पवार यांच्याकडून मला कधी भाऊबीज चुकत नाही. ‘आमचे दाजी काय म्हणतात?’ अशी चेष्टेने विचारणा केल्याशिवाय ते राहत नाहीत. त्यांना व वहिनी प्रतिभा यांना उत्तम आरोग्य लाभो, हीच या निमित्ताने शुभेच्छा...
खोडकर
शरद पवार लहानपणी फारच खोडकर होते. त्यामुळे आई त्यांना आमच्यासोबत शाळेत पाठवायची, परंतु शाळेत आल्यावर कुणाची वही लपव, कुणाचे दप्तर दुसरीकडे नेऊन ठेव, असे उद्योग करायचे. त्यामुळे ‘भावाला सोबत आणलंत तर तुमची शाळा बंद होईल, असे सांगितल्यावर त्यांना आम्ही न्यायचेच बंद केले.
आमच्या कुटुंबाकडे सुरुवातीपासूनच त्यांचे आस्थेने लक्ष आहे. मी स्वत: मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीत पंचवीस वर्षे काढली. प्रा.एन. डी. पाटील यांच्याबद्दल त्यांना कमालीचा आदर. प्रा.पाटील पवार यांच्यावर कडवट टीका करायचे, परंतु ही दोन्ही माणसे इतकी थोर की, त्यांनी हा त्यांचा कडवटपणा कधीच नात्यात उतरू दिला नाही. एन.डी. पाटील यांच्या प्रत्येक आजारपणात शरद पवार व प्रतिभा पवार आमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले.
(शब्दांकन : विश्वास पाटील)