कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला थेट शरद पवारांचा फोन, म्हणाले 'निलेश काहीही लागलं तर कळव'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:08 PM2021-05-02T12:08:08+5:302021-05-02T12:10:29+5:30
Coronavirus In Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत कोरोना केंद्र सुरू केलं असून त्यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत कोरोना केंद्र सुरू केलं असून त्यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. पारनेरमधील नागरिक निलेश लंके यांना थेट देवमाणूस समजू लागले आहेत. आमदार निलेश लंके स्वत: या कोविड सेंटरमध्ये दिवसरात्र मेहनत घेत आहेत. निलेश लंके यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: घेतली आहे. शरद पवार यांनी रुग्णालयातून घरी आल्यावर आमदार निलेश लंके यांना फोन केला होता.
"मी घाबरून बसलो तर लोकांनी कोणाच्या दारात बसायचं"; आमदार निलेश लंके करतायत दिवसरात्र रुग्णांची सेवा
"निलेश तू कोरोना रुग्णांसाठी मोफत कोविड सेंटर सुरू केले ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. तू स्वत: त्यात जातीनं लक्ष देतोयस. त्या ठिकाणी रुग्णांची अतिशय चांगली व्यवस्था देखील ठेवली आहेस असं समजलं हे अतिशय चांगलं काम आहे. पण हे काम करताना तू स्वत:चीही काळजी घे आणि काहीही अडचण आली तर मला कळव", असं शरद पवार यांनी निलेश लंके यांना म्हणाले आणि मोठा आधार दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं आहे. शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर असं त्यांनी या सेंटरला नाव दिलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निलेश लंके यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारलं होतं.
"आपलं काय व्हायचं ते होऊ द्या. जर मी घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोकं सुरक्षित असली पाहिजेत," असं म्हणत लंके हे दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहेत. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो त्यांचा कुटुंबप्रमुखही असतो, अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांना याबाबतची माहिती मिळाली होती. पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यानं ते रुग्णालयात होते. त्यामुळे निलेश लंके यांच्याशी त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. पण रुग्णालयातून परतल्यानंतर शरद पवार यांनी आवर्जुन निलेश लंके यांच्या कामाची दखल घेत फोन करुन शाबासकी दिली.