'करेक्ट कार्यक्रमा'ची शरद पवारांकडून स्तुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:32 PM2021-02-27T18:32:38+5:302021-02-27T18:36:55+5:30
Politics Sangli JayantPatil Sharadpawar- सांगली महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी कौतुक केले. त्यांच्याकडून महापालिकेची सुत्रे आघाडीने ताब्यात घेतली ते बरे झाले, असे मत त्यांनी मांडले.
सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी कौतुक केले. त्यांच्याकडून महापालिकेची सुत्रे आघाडीने ताब्यात घेतली ते बरे झाले, असे मत त्यांनी मांडले.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, आयुब बारगीर यांनी शनिवारी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरेही उपस्थित होत्या.
शरद पवार यांनी यावेळी महापालिकेत नेमके काय व कसे घडले याची माहिती बजाज यांच्याकडून घेतली. फुटलेले व तटस्थ नगरसेवक कोण होते, याची माहिती घेतल्यानंतर पवार यांनी ते यापुढे आपल्यासोबत राहणार आहेत का, याबाबत विचारणा केली. त्यावर बजाज यांनी ते पूर्वी आपल्याकडेच होते, त्यामुळे काही अडचण नाही, असे सांगितले.
पवार म्हणाले की, केंद्रात व राज्यात सत्ता मिळविल्यानंतर भाजपने आघाडीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकारण केले. आपलेच लोक फोडून त्यांनी संस्था ताब्यात घेतल्या. त्यामुळे सांगलीत ज्या गोष्टी घडल्या त्या बऱ्या झाल्या. महापौर निवडीतून सांगलीने चांगली सुरुवात केली आहे.
राज्यभरातील आपल्या लोकांना यामुळे बळ मिळेल. याचे लोण सर्वत्र पसरेल. महापालिकेची सुत्रे हातात घेतल्यानंतर आता लोकांसाठी चांगली कामे करावीत. काही अडचणी आल्या तर शासनाकडे चिकाटीने पाठपुरावा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
जयंतरावांकडे पाठपुरावा करा
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या काही प्रलंबित योजनांबाबतची माहिती पवारांना दिली. त्यावर पवार यांनी या सर्व योजनांसाठी जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करा, शासनाकडून सांगलीसाठी सर्व ती मदत होईल, असे स्पष्ट केले.
भाजप नेत्यांच्या वक्तव्याची चर्चा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रवक्ते आ. गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची माहिती बजाज यांनी पवारांना दिली. त्यावर जयंत पाटील यांनी त्यांना त्यांच्याच शब्दात कसे उत्तर दिले, याचाही खुलासा केला.