शरद पवार : न झालेले पंतप्रधान..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 07:43 PM2020-12-12T19:43:34+5:302020-12-12T19:56:23+5:30
Sharad Pawar Birthday : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे शरद पवार बाभूळ झाडासारखे घट्टपणे उभे आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले शरद पवार यांनी प्रसंगी दिल्ली श्रेष्ठींशी संघर्षही केला. यासंदर्भात ते यशवंतरावांच्या दोन पाऊल पुढे आहेत.
- मधु भावे
(ज्येष्ठ पत्रकार )
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे शरद पवार बाभूळ झाडासारखे घट्टपणे उभे आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले शरद पवार यांनी प्रसंगी दिल्ली श्रेष्ठींशी संघर्षही केला. यासंदर्भात ते यशवंतरावांच्या दोन पाऊल पुढे आहेत. ते ८१व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. जीवनात त्यांना अपयश माहीत नाही. १९६७ सालापासून २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत देशभरात अव्वल मतांनीच ते निवडून येत आहेत. १९८४च्या लोकसभा पोटनिवडणुकीत (इंदिराजींच्या हत्येनंतर जी निवडणूक झाली) राजीव गांधींच्या खालोखाल क्रमांक दोनची (५लाख ४ हजार ) मतांच्या फरकाने विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले. बारामती असो किंवा माढा असो, त्यांना अपयश माहीत नाही. निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर मतदारसंघात जाणारे आणि तीन-चार लाख मतांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून येणारे ते एकमेव नेते आहेत. मतदारसंघ न बदलता सलग चाळीस वर्षे त्यांनी बारामती जिंकली. देशात त्यांच्या तोडीचा मोठा नेता नाही. ते पंतप्रधान झाले नसले तरी ते होणार नाहीत असे सांगता येणार नाही. कदाचित २०२४ साल त्यांच्याच नावावर असेल. पण आज ‘पंतप्रधान नसलेला पंतप्रधान’ असा त्यांचा उल्लेख करावा लागेल.
२२व्या वर्षी युवक काँग्रेसचे अध्यक्ष २७व्या वर्षी आमदार, ३२व्या वर्षी मंत्री, ३८व्या वर्षी मुख्यमंत्री, ४०व्या वर्षी विरोधी पक्षनेता, ५१व्या वर्षी संरक्षणमंत्री. रयत शिक्षण संस्था, मुंबई क्रिकेट असोसिएशन, जागतिक क्रिकेट असोसिएशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू विज्ञान केंद्र, नाट्य परिषद अशा अनेक संस्थांना त्यांनी मोठे केले. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, व्ही.पी. सिंग आणि मोदी पंतप्रधान होतात. मग नेतृत्वाचे अनेक गुणविशेष पवार यांच्याकडे असताना, ते का होऊ शकणार नाहीत? आकड्यांचा खेळ जमत नाहीत, म्हणून त्यांचे पंतप्रधानपद हुकणे म्हणजे सुयोग्य नेतृत्वाला लोकशाहीने संधी नाकारणे असे होता कामा नये.
पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. २०१४ ते २०१९ पर्यंत पुरोगामी महाराष्ट्रावर असलेले भाजप सरकार दूर करण्यासाठी पवारांचे राजकीय नैपुण्य पणाला लागले. लोकसभा निवडणुकीत पावसात भिजलेल्या सह्याद्रीलाही ओलेचिंब होऊन जनतेने स्वीकारले. राज्यात पुरोगामी सरकार आणणे हेच पवार यांच्यासमोर आव्हान होते. काँग्रेस व राष्टवादीची आघाडी होतीच. त्या निवडणुकीनंतर शिवसेनेसारख्या आक्रमक राजकीय नेतृत्वाला सोबत घेऊन नवा इतिहास पवार यांनी घडवला.
२०२४च्या निवडणुकीत मराठी सेनापतीला पंतप्रधानपदाची संधी मिळणे हे लक्ष्य घेऊन पुढची ४ वर्षे काम केले तर हे स्वप्नरंजन उद्याचे वास्तव ठरेल. मतदार उबलेल्या मानसिक अवस्थेतून बाहेर येईल आणि मराठी नेत्याचे एक पाऊल पुढे पडून आज ‘पंतप्रधान नसलेले पंतप्रधान’ देशाचे उद्याचे नेते होतील, या कोटी कोटी शुभेच्छा त्यांना देऊ या.
शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात
महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक २०१९ साली मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तळपत्या उन्हात संपली. निवडणूक संपली त्या दिवशी रात्री काही राजकीय नेते कोणी जीनिव्हाला गेले, पॅरिसला गेले, तर कोणी सिंगापूरला. शरद पवार मात्र लोकसभा निवडणूक संपल्याच्या दुसऱ्या दिवशी ४७ अंश कडक तापमान असलेल्या सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बांधावर उभे राहून, त्या शेतकऱ्याच्या खांद्यावर हात टाकून भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत तो करत असलेले कष्ट पाहून अशा शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याची चर्चा करत होते. ...अन्य नेते आणि शरद पवार यांच्यातील फरक पावसात भिजलेल्या सह्याद्रीने जसा दाखवून दिला, तसाच तळपत्या उन्हात शेतकऱ्याच्या बांधावर उभ्या राहणाऱ्या नेत्यानेही दाखवून दिला.