Sharad Pawar : पावसातला सह्याद्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 06:14 AM2020-12-12T06:14:22+5:302020-12-12T06:14:50+5:30

Sharad Pawar Birthday : शरदचंद्रजी पवार साहेब... यांच्या सातारा येथील पावसातील ऐतिहासिक सभेच्या अनुषंगाने पुस्तक येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज यानिमित्ताने लोकांना वाचायला मिळणार आहे.

Sharad Pawar: Sahyadri in the rain! | Sharad Pawar : पावसातला सह्याद्री !

Sharad Pawar : पावसातला सह्याद्री !

googlenewsNext

श्रीनिवास पाटील, खासदार
((भा. प्र. से निवृत्त) माजी राज्यपाल सिक्किम)

वयाच्या 3७ व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची राज्यकारभाराची सूत्रे ज्यांनी स्वीकारली ते आमचे ‘साहेब’ चारवेळा कठीण प्रसंगी महाराष्ट्राचा कारभार सांभाळण्यासाठी पदारूढ झाले. कठोर प्रशासक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, पुलोद सरकारचे मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात झाली ती मुंबईत पावसाळी अधिवेशन काळात. वेगवेगळ्या पक्षांंचे चार-पाच सहकारी, कोणालाच विधिमंडळात मंत्री म्हणून पूर्वीचा अनुभव नव्हता, प्रश्नाची उत्तरे पहिला पूर्ण आठवडा एकट्यानेच साहेबांनी समर्थपणे दिली. आबासाहेब खासदार किसनवीर आणि खासदार आबासाहेब कुलकर्णी प्रेक्षकांच्या गॅलरीत दिवसभर या तरुणाच्या कामाचा उरक,  प्रश्नांची अचूक उत्तरे, विरोधकांना नम्र उत्तराने नामोहरम करण्याचे कसब, अभ्यासू समयसूचक सडेतोड विवेचन आणि स्वकीय आमदारांना सांभाळण्याचे कौशल्य ज्यांनी दाखविले त्या साहेबांचे कौतुक रोज दोन ‘आबासाहेब’ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला फोन करून कळवित असत. 

अचूक वेळ म्हणजेच १० वाजून १० मिनिटे दाखवणारे गजराचे घड्याळ ज्यांनी चिन्ह म्हणून निवडले त्यांना राष्ट्र समजते आणि ‘टाईमिंग’ जमतेच. अचूक निर्णय घेऊनच जनमाणसात जे घोषणांचा व त्यांच्या पूर्ततेचा गजर करवतात, असे मराठी जनतेच्या मनात घर केलेले खरे लोकनेते,  ‘पावसातला सह्याद्री’ म्हणून लोकांच्या प्रसंशेला पात्र ठरलेले दूरदृष्टीचे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब... यांच्या सातारा येथील पावसातील ऐतिहासिक सभेच्या अनुषंगाने पुस्तक येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज यानिमित्ताने लोकांना वाचायला मिळणार आहे.


पवार साहेबांच्या बाबतीत खूप काही लिहिलं गेलंय, यापुढेही लिहिलं जाईल. वेधशाळेचा अंदाज बराच वेळा खोटा ठरतो व बराच वेळा खरा ठरत नाही. वारा कसा फिरेल किंवा कसा फिरवावा, याची खात्री व कसब साहेबांना नेमके आहे. अनेक सामाजिक-राजकीय आंदोलनाच्या वाऱ्याला अंगावर घेऊन जे झेपावतात. शरदचंद्र पवार साहेब उजव्या हाताचा वापर करून अनेक गरजूंना भरभरून देतात; पण त्यांच्याच डाव्या हाताला ते दान कधीच माहीत होऊ देत नाहीत. किती दिले उजव्या हाताने याची गणती नाही. सगळ्यांचे म्हणणे आणि टिकाटिपण्णी ते डाव्या कानाने ऐकून मनात साठवितात आणि वेळ येताच सेकंदाच्या आत बैठकीत त्यावरचे आपले मत ठामपणे मांडतात व जाहीर सभांत ठणकावून सांगतात देखील... तो आमचा खणखणीत आवाज म्हणजे, शरदचंद्रजी पवार साहेब...

गडगडणाऱ्या पावसात अचानक हवेचा जोर वाढतो, ढगांची नभात दाटी होते, असा वळवाचा जोरदार, धुवाँधार भिजणाऱ्याला आनंद देणारा आणि उकाड्याने हैराण झालेल्यांना भिजवून गार करणारा हवाहवासा पाऊस म्हणजे आमचे साहेब शरदचंद्रजी पवार. साहेबांनी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी मराठा समाजाच्या राजधानीत अर्थात साताऱ्यात इतिहास रचला. 

थेंबांनी दिवस मावळता-मावळता सुरू झालेला आमचा जाणता राजा व्यासपीठावर जाऊन उभा राहून लोकांना अभिवादन करीत असतानाच, तालावर पडघम वाजावे आणि ढोलांनी त्याला जोरदार साथ द्यावी, तसा जोरदार पाऊस आला. तो नित्यनियमाचा मोसमी पाऊस नव्हता तर सह्याद्रीचे बळ वाढविणारा होता. छत्र्या आणल्याच नव्हत्या म्हणून बसायला दिलेल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन सह्याद्रीच्या वाघाची डरकाळी ऐकताना भान विसरलेला श्रोता चिखलात उभा राहून त्यांना अभूतपूर्व अशी साथ देत होता. जोरदार पाऊस पडतोय; पण त्यातूनही चेहऱ्यावर पडणाऱ्या बोराएवढ्या थेंबांनी भिजलेला चेहरा अशा स्थितीत, एका हाताने खुर्ची सावरत तर दुसऱ्या हाताने चेहऱ्यावरील पाणी पुसणारा श्रोता... समोर पावसात उभा असलेल्या आपल्या नेत्याचे भाषण ऐकत असताना समोरची जनताही प्रचंड अशी भावूक झाली होती. मलाही पवार साहेबांच्या डाव्या हाताला त्याच व्यासपीठावर उभा राहून त्यांचे शब्द उमेदीने ऐकता आले, हे माझे भाग्यच... पवार साहेबांच्या रुपाने हा ‘पावसातला सह्याद्री’ दिल्लीच्या दिशेने तालकटोरा मैदानावर मुक्काम ठोकायला निघाला आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा...!
जय शिवराय, जय जवान, जय किसान..

Web Title: Sharad Pawar: Sahyadri in the rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.