"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 21:05 IST2024-10-14T21:02:40+5:302024-10-14T21:05:40+5:30
Sharad Pawar: साताऱ्यातील सभेत काही तरुणांनी ८४ वर्षाचा म्हातारा असे फलक धरले होते. ते बघून शरद पवार काय म्हणाले?

"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
Sharad Pawar: साताऱ्यातील कार्यक्रमाला शरद पवार आले, तेव्हा तिथे काही तरुणांच्या हातात फलक बघितले. शरद पवारांचा फोटो आणि ८४ वर्षांचा म्हातारा असे लिहिलेले पोस्टर होते. ते पोस्टर बघून शरद पवारांनी वय कितीही झालं तरी थांबणार नाही, असे म्हणत निर्धार व्यक्त केला.
फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी काही तरुण शरद पवारांचे पोस्टर घेऊन उभे होते.
शरद पवार काय म्हणाले?
कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, "यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. आज ७० वर्षे होऊन गेली, वारा प्रचंड असताना त्या पुतळ्याला धक्का बसला नाही. आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतो? त्याचे चार तुकडे होतात. याचं कारण पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. तो भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी करणं, ही आजच्या राजकर्त्यांची नीती आहे. त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं, हेच काम तुम्हाला आणि मला, सगळ्यांना करायचं आहे. तेच काम सबंध महाराष्ट्रात फिरून आम्ही लोक करत आहोत."
'८४ वर्षांचा म्हातारा' शरद पवार म्हणाले...
"आता याठिकाणी काही तरुण मुलं माझा बोर्ड घेऊन उभे होते. माझा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं, 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. अजून लांब बघायचं आहे. ८४ होवो, ९० होवो... हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तु्म्ही त्याची काळजी करू नका. या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत अंतःकरणापासून होईल. याची खात्री मी बाळगतो", असे भाष्य शरद पवारांनी केले.