देशाचं नेतृत्व करण्याची शरद पवारांमध्ये क्षमता: संजय राऊत
By मोरेश्वर येरम | Published: December 10, 2020 06:05 PM2020-12-10T18:05:37+5:302020-12-10T18:08:03+5:30
देशाचे प्रश्न हाताळण्यासाठी शरद पवारांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे 'यूपीए'च्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. "शरद पवार यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे", असं संजय राऊत म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यानंतर विरोधकांची पुन्हा एकदा मोट बांधली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल", असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाबाबत संजय राऊत यावेळी भाष्य केलं. "शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्याकडे राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राजकारणातला दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि जनतेची जाण असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देशाचे प्रश्न हाताळण्यासाठी त्यांचा अनुभव नक्कीच कामी येईल. यापुढील काळात देशाच्या राजकारणात काय बदल होतील हे मी आताच सांगू शकत नाही", असं संजय राऊत म्हणाले.