देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणी; प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादीची गुप्त खलबते

By अतुल कुलकर्णी | Published: June 12, 2021 07:02 AM2021-06-12T07:02:43+5:302021-06-12T07:03:46+5:30

Sharad Pawar : प्रशांत किशोर यांच्यासोबत रणनीती आखण्याबद्दल शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती असल्याचे समजते. देशपातळीवर कशा पद्धतीने नियोजन केले जावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली.

Sharad Pawar's anti-BJP front formation in the country and state; NCP's secret with Prashant Kishor | देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणी; प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादीची गुप्त खलबते

देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणी; प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादीची गुप्त खलबते

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी

मुंबई : देशात आणि राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल तीन तास गुप्त खलबते केली. महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपला दूर ठेवायचे, त्याच वेळी देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम पर्याय कसा द्यायचा, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. 

प्रशांत किशोर यांच्यासोबत रणनीती आखण्याबद्दल शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती असल्याचे समजते. देशपातळीवर कशा पद्धतीने नियोजन केले जावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या समवेत भोजनही केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी कशा पद्धतीने रणनीती आखली जावी, मतदारसंघनिहाय नियोजन कशा पद्धतीने केले जावे, यावरही किशोर यांनी भाष्य केल्याचे समजते.

बैठकीत खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते. देशपातळीवर विचार करताना विरोधकांकडे आश्वासक चेहऱ्याची गरज आहे. त्यासाठी  सामूहिक नेतृत्व पुढे आणावे लागेल. राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी, असे चित्र पुढे येऊ नये यावरही बैठकीत विचारविनिमय झाला. 

भाजप समाजातल्या प्रत्येक घटकांवर आणि प्रसंगावर भाष्य करते. कोणाला पटो न पटो भूमिका घेते. समाजाच्या दोन वाटण्या करायच्या आणि एक वाटा काँग्रेसला देऊन त्यावरून काँग्रेसची बदनामी करायची, ही रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होत असताना, त्यांच्याकडून फारशी हालचाल होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी थेट संपर्कावर भर द्यावा लागेल. लोकांमध्ये थेट जावे लागेल. तरच भाजपने तयार केलेले पर्सेप्शन बदलू शकते, असे मत प्रशांत किशोर यांनी बैठकीत मांडले. भारताचा विचार करता कमी शिक्षित भागात आणि एससी आणि एसटीसाठी राखीव मतदारसंघांमध्ये भाजपला जास्त मतदान झाल्याची आकडेवारी किशोर यांनी सांगितली. 

भाजप वगळता अन्य पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्याचे काम केले जात नाही. लोकसभेला आणि विधानसभेच्या वेळी काँग्रेस जिंकण्यासाठी लढताना दिसली नाही. परिणामी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये निरुत्साह होता. काँग्रेसला जास्त जागा सोडल्या तर भाजपला कसा फायदा होतो, याची आकडेवारीही प्रशांत किशोर यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. 

स्थानिक आघाड्यांमुळे कॉंग्रेसचे मतविभाजन, फायदा झाला भाजपला
- २००९ मध्ये लोकसभेला भाजपला १८.८ टक्के मते आणि ११६ जागा मिळाल्या. दहा वर्षांनी काँग्रेसला २०१९ मध्ये १९.६९ टक्के मते आणि ५२ जागा मिळाल्या. 
- दहा वर्षांनंतर काँग्रेसला एक टक्का जास्त मते मिळूनही त्यांच्या ६४ जागा कमी झाल्या. 
- त्याचे कारण त्या, त्या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाले. त्याचा फायदा भाजपला झाला, हे किशोर यांनी शरद पवार यांना पटवून दिले.

यंत्रणा उभारा
जुन्या व नव्याने येणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी,  पक्षीय मुद्दे पोहोचवण्यासाठी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे शास्त्रीय पद्धतीने काम करणारी यंत्रणा नाही. ती यंत्रणा उभी करावी लागेल, अशी सूचना त्यांनी केली.

ठामपणे भाजपविरोधी भूमिका न घेणाऱ्यांशी बोलणार 
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणाचे चंद्रशेखर राव हे तिघे आजही मोदीविरोधी ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. यासाठी जगनमोहन रेड्डी यांच्याशी प्रशांत किशोर बोलतील. बाकी दोघांशी स्वतः शरद पवार यांनी बोलावे, अशीही चर्चा झाली. 

...उर्वरित ३० टक्के मतदान चित्र बदलते 
ज्या ठिकाणी मजबूत प्रादेशिक पक्ष आहेत त्या ठिकाणी काँग्रेसला जास्त जागा सोडल्यास काँग्रेसचे नुकसान व भाजपचा फायदा होतो. स्थानिक प्रादेशिक पक्षांना त्यामुळे नुकसान होते, असे सांगून प्रशांत किशोर यांनी त्यासाठीचे नियोजन करावे लागेल असे सांगितले. धर्म, पंथ, गट, संघटना यांचे कितीही ध्रुवीकरण झाले तरी त्या गटातून ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मिळू शकत नाहीत. उर्वरित ३० टक्के मतदान निवडणुकीचे चित्र बदलू शकते. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. 
 

Web Title: Sharad Pawar's anti-BJP front formation in the country and state; NCP's secret with Prashant Kishor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.