"होळकरांच्या सामाजिक कार्याचा उपयोग करून राजकीय स्वार्थ साधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न’’ इंदूरच्या होळकरांचा गंभीर आरोप
By बाळकृष्ण परब | Published: February 12, 2021 04:38 PM2021-02-12T16:38:22+5:302021-02-12T16:43:12+5:30
Sharad Pawar News : जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पेटलेले राजकारण आता अधिकच तीव्र झाले आहे.
मुंबई/इंदूर - जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पेटलेले राजकारण आता अधिकच तीव्र झाले आहे. एकीकडे भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी आज पहाटे या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून वाद झाला असतानाच आता अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती () यांना होळकर कुटुंबीयांनी (Indore's Holkar) याबाबत पत्र लिहिले असून, त्या पत्रामधून शरद पवार यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
इंदूरच्या होळकर घराण्यातील भूषणसिंहराजे होळकर यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये होळकर म्हणतात की, होळकर घराणे आणि छत्रपती घराण्याचे संबंध अनेक पिढ्यांपासूनचे आहेत. दोन्ही घराण्यांनी समाजहितासाठी काम करून लोकमान्यता मिळवली आहे. आपला पूर्ण सन्मान ठेवून आपणास एक बाब निदर्शनास आणून द्यायची आहे. जी आपल्यापासून मुद्दामहून लपवली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र करून स्वराज्य उभारले. नंतरच्या काळात छत्रपती घराणे व होळकर घराणे यांनी सोयरिकही केल. बहुजन समाज एक होऊन राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी हा त्यामागचा हेतू होता.
परंतु आता होळकर घराण्याच्या समृद्ध सामाजिक कार्याचा उपयोच करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या माध्यमातून होत आहे. समाजाचे अनेक प्रश्न असताना फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून आपला हेतू साध्य करणे हा त्यांचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून कथित विदेशी मूळचे होळकर ज्यांना येथील तत्कालिन सरकार आणि समाजाने नाकारले. आपले आजोबा श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज ज्यांच्याविरोधात होते. अशा व्यक्तींच्या उपस्थितीत जेजुरी येथे कार्यक्रम घेत आहेत हा माँसाहेबांच्या कार्याचा अवमान आहे, अशी समस्त बहुजन समाजाची भावना आहे. होळकर घराण्याच्या परंपरेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकामध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, अशा व्यक्तींना महाराष्ट्रात जेजुरी गडावर पुतळा अनावरणाचे आमंत्रण देऊन चुकीचा संदेश देण्याचे आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे, याचा विचार आपणाकडून व्हायला हवा, असे संभाजी राजे यांना लिहिलेल्या या पत्रात होळकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी पेरलेल्या घाणेरड्या राजकारणाची मुळं महाराष्ट्रात रुजत असतील तर त्याचे दीर्घकालीन परिणाम हे समाजाला भोगावे लागतील. याची आपणासही जाणीव असेलच. त्याऐवजी एखाद्या शहीद जवानाची वीरमाता किंवा पत्नी, शेतकरी, मेंढपाळ यांनी हे अनावरण केले असते तर तो माँसाहेबांच्या कार्याचा गौरव ठरला असता, असेही या पत्रात म्हटले आहे.
जेजुरी गडावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवारांच्या हस्ते आणि तुमच्या अध्यक्षतेखाली होणार होते. मात्र त्यापूर्वीच या पुतळ्याचा कार्यक्रम धनगर आणि मेंढपाळ युवकांनी आज पहाटे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत बहुजन समाजात किती अस्वस्थता आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. त्यामुळे बहुजन समाजाच्या भावनांचा आदर करून या कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याबाबत तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो, असे आवाहन या पत्रामधून करण्यात आले आहे.