दोनदा हुकले शरद पवार यांचे पंतप्रधानपद!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:38 PM2020-12-12T17:38:50+5:302020-12-12T17:43:31+5:30

Sharad Pawar Birthday : पवार यांच्यापासून पंतप्रधानपद कसं आणि कोणामुळे लांब गेलं हे मी पाहिलं आहे. पवार प्रतिस्पर्धी म्हणून असल्याने राव यांच्या मनात त्यांच्याविषयी अढी होती. पवारांचं महत्त्व कमी करायचं, हा विचार त्यांच्या मनात सुरू असे.

Sharad Pawar's PM post missed in two time! | दोनदा हुकले शरद पवार यांचे पंतप्रधानपद!

दोनदा हुकले शरद पवार यांचे पंतप्रधानपद!

Next

- खा. प्रफुल्ल पटेल
(माजी केंद्रीय मंत्री) 

शरद पवार यांना मी पहिल्यांदा भेटलो, १२ वर्षांचा असताना. पण त्यांच्याशी स्नेह जुळला, तो १९७८ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर. मंत्री छेदीलाल गुप्ता यांच्यासह मी पवार यांना भेटायला गेलो. तेव्हा पवार यांनी माझ्या वडिलांचे अनेक किस्से सांगितले. पुलोदचं सरकार १९८० मध्ये बरखास्त केलं. निवडणुकीनंतर अंतुले मुख्यमंत्री आणि पवार विरोधी पक्षनेते झाले. मी राजकारणात नव्हतो, तरी भंडारा-गोंदियामध्ये सक्रिय होतो. पवार यांनी मला राजकारणात येण्यास प्रोत्साहन दिलं. १९८९ मध्ये प्रदेश काँग्रेसमध्ये, मंत्रिमंडळातच बंड घडवून आणलं गेलं. दिल्लीतील आर. के. धवन, माखनलाल फोतेदार आदी मंडळींचं ते कारस्थान होतं. मजबूत नेतृत्वाला दुबळं करण्यासाठी पक्षातूनच विरोधक उभे करायचे, त्रास द्यायचा, या षडयंत्राचाच तो भाग होता. पण, पवार यांची पक्षावरची पकड पक्की असल्याने बंड फसलं. पवार मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.

१९९१च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेसला सावरण्यासाठी पवार यांना पक्षाचं अध्यक्ष करावं, असा मतप्रवाह कॉंग्रेसमध्ये होता. पण दिल्लीत ‘दरबारी’नी डाव टाकला. ‘पवार नको’ म्हणून नरसिंह राव यांना पक्षाध्यक्ष केलं. निकालात कॉंग्रेस बहुमताजवळ आली होती. पंतप्रधानपदी शरद पवार यांना निवडलं जावं, असा मतप्रवाह होता. पण, पवारांना रोखण्यासाठी कारस्थान्यांनी सोनिया गांधींच्या नावाचा वापर, गैरवापर करून, राव यांनाच पंतप्रधानपदी बसवलं! पवार यांना संरक्षण हे महत्त्वाचं खातं दिलं.

पवार यांच्यापासून पंतप्रधानपद कसं आणि कोणामुळे लांब गेलं हे मी पाहिलं आहे. पवार प्रतिस्पर्धी म्हणून असल्याने राव यांच्या मनात त्यांच्याविषयी अढी होती. पवारांचं महत्त्व कमी करायचं, हा विचार त्यांच्या मनात सुरू असे. १९९२च्या मुंबईतील बॉम्बस्फोट आणि दंगलींचं कारण मिळालं. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना त्यांना हटवायचं होतंच. रावांनी चतुराईने मोठेपणा देऊन पवार यांना मुंबईला पाठवण्याची योजना आखली. परिस्थितीच अशी होती की, पवार यांनी महाराष्ट्राची सूत्रं हाती घेतली.

१९९६च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे १४५ खासदार निवडून आले. देवेगौडा, लालूप्रसाद, मुलायमसिंह, डाव्या पक्षांचे नेते म्हणाले... ‘पवारांनी पुढाकार घेतला, रावांना बाजूला केलं, तर आम्ही सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहोत.’  पण, राव ऐकेनात. त्यामुळे, कॉंग्रेसने देवेगौडा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला! यातल्या बहुतेक घडामोडी माझ्या घरातूनच होत होत्या.

थोड्याच दिवसांत कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या. त्यात मी, भूपिंदर हुड्डा, पी. सी. चाको, गिरीजा व्यास आदींनी एकत्र येऊन राव पुरस्कृत पॅनेलचा पराभव केला. राव यांनी राजीनामा देताना पवार नकोत, म्हणून सीताराम केसरींना पुढे केलं. अध्यक्षपदाची माळ केसरींच्या गळ्यात पडली. ११ महिन्यांनंतर केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सुमारे १२५ खासदार दोन तासांत पवार यांच्या घरी आले. ‘निष्ठावंत’ खासदारही त्यात होते. संसदीय पक्षनेतेपदी पवार यांची निवड करावी, अध्यक्षपदावरून केसरींना दूर केलं जावं, असे ठराव एकमताने झाले. तेव्हाच देवेगौडांनी निरोप पाठवला, ‘मला काही दिवस द्या. मी स्वतः राजीनामा देईन. पवारांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या सरकारची वाट सुकर करेन.’ पण, वाट न पाहता, पक्ष फुटू नये म्हणून पवारांनी माघार घेतली. महत्त्वाकांक्षा असूनही पक्षहितासाठी नरमाईची भूमिका घेतली. केसरी देवेगौडांना पाठिंबा द्यायला तयार नव्हते. अखेर पक्षाने देवेगौडांना राजीनामा द्यायला लावून इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला! पवार यांचे पंतप्रधानपद पुन्हा हुकल्याचे आम्ही पाहत होतो.

नंतर पवार कॉंग्रेस संसदीय पक्षाचे नेते असूनही पक्षाध्यक्ष त्यांना अडचणीत आणत होते. संसदीय रणनीतीसंदर्भात वेगळ्याच भूमिका घेऊ लागले. अनेकांना हे मान्य नव्हतं. अखेर डॉ. मनमोहन सिंग आणि पवार यांनी सोनिया गांधी यांना परिस्थितीची कल्पना द्यावी, असं ठरलं. दोघेही जण सोनिया गांधींना भेटले. पक्षाचं नुकसान टाळायचं असेल तर त्यांनीच अध्यक्ष होण्याची गरज पटवून दिली. त्यांनाही ते पटलं आणि १९९८ मध्ये सोनिया गांधी पहिल्यांदा अध्यक्ष झाल्या.

१९९८च्या लोकसभा निवडणुकीत पवार यांनी चमत्कार केला. रा. सू. गवई, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या रिपब्लिकन नेत्यांना खुल्या मतदारसंघातून निवडून आणलं. महाराष्ट्रातून पक्षाचे तब्बल ४३ खासदार निवडून आले! पण, देशात कॉंग्रेसची कामगिरी चांगली झाली नाही. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं, पण १३ दिवसांत कोसळलं. तेही पवारसाहेबांमुळेच. मायावतींचं मत अखेरच्या क्षणी पवारसाहेबांनीच फिरवलं होतं. तरीही त्यांना मोकळीक मिळाली नाही. ते संसदीय पक्षाचे नेते असूनही असे अनेक निर्णय होत, की ज्याची त्यांना गंधवार्ताही नसे. त्यांचा जाहीर पाणउतारा होईल, अपमान होईल अशी एकही संधी तथाकथित नेते सोडत नव्हते. संसदीय पक्षाचा नेता म्हणून पवार काही भूमिका निश्चित करत, त्यानुसार लोकसभाध्यक्षांना पत्र देत. पक्षाचे प्रतोद पी. जे. कुरियन मात्र वेगळी भूमिका घेत. संसदीय समित्यांवर नेमणुकीसाठी करायच्या खासदारांच्या नावांच्या शिफारशीही परस्पर बदलत. महाराष्ट्रातही महत्त्वाच्या पदांवर त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या नेमणुकांचा सपाटा सुरू होता. हे असह्य झालं तेव्हा त्यांनी निर्णय घेतला. आता फार झालं! 

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म त्यानंतर झाला..! शरद पवार यांचं वैशिष्ट्य असं की, त्यांच्यात कटुता, खुनशीपणा नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रैसला राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतरही सरकार स्थापनेसाठी आमची कॉंग्रेसबरोबर आघाडी झाली. ती आजपर्यंत कायम आहे. 
आपलं भाग्य की, असा नेता आपल्याला लाभला आहे. या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त एकच प्रार्थना करतो : हे परमेश्वरा, देशाच्या-समाजाच्या भल्यासाठी शरद पवार यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य दे. त्यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व आम्हाला कायमच लाभू दे...!

सर्व पक्षांतून मिळाला सन्मान..!  
२००१मध्ये पवार यांच्या एकसष्टी समारंभाचा संयोजक म्हणून मी वाजपेयीजींना आमंत्रण द्यायला गेलो, तेव्हा ते म्हणाले, ‘अगर शरदजी के जन्मदिन के समारोहपर नहीं आऊंँगा, तो हमारी मित्रता का इससे बडा अन्याय क्या हो सकता है?’ पंचाहत्तरीच्या समारंभाचं वर्णन काय करू? सगळ्या पक्षांचे, विचारधारांचे शीर्षस्थ नेते सन्मानासाठी उभे होते. आजही संसद भवनात पंतप्रधानांपासून ते कोणत्याही पक्षाच्या ज्येष्ठ खासदारांपर्यंत सगळे जण त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने बोलायला येतातच. असा मानसन्मान असणारे किती नेते राहिलेत आता?  
 

Web Title: Sharad Pawar's PM post missed in two time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.