Shashi Tharoor: शशी थरुर यांच्याकडून भाजपला ‘शब्दांचा’ मार; म्हणाले, “आपण तो शिकून घेतला पाहिजे”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:11 AM2022-01-10T11:11:33+5:302022-01-10T11:12:45+5:30
Shashi Tharoor: शशी थरुर यांनी भाजपवर टीका करताना वेगळ्याच एका शब्दाचा वापर केला असून, त्याचा अर्थ काय? जाणून घ्या...
नवी दिल्ली: काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत असतात. कोरोनापासून ते भारत-चीन सीमावादापर्यंत अनेक विषयांवरून भाजप नेते, मंत्री यांच्यावर विरोधक निशाणा साधताना दिसतात. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांची शैली काहीशी वेगळी आहे. ते टीका करताना अशा शब्दांचा वापर करतात की, अनेकदा शब्दकोष उघडून पाहण्याची वेळ येते. आताही शशी थरुर यांनी भाजपवर निशाणा साधताना वेगळ्याच एका शब्दाचा वापर केला असून, आपण भारतात एक शब्द शिकून घेतला पाहिजे, असे म्हटले आहे.
शशी थरुर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका करताना अॅनॉक्रॉसी (Anocracy) हा शब्द वापरलाय. जेव्हा एखादे सरकार लोकशाहीपद्धतीने कारभार करताना त्यामध्ये हुकुमशाही तत्वाचा समावेश करते त्या गोष्टीला अॅनॉक्रॉसी असे म्हणतात, अशा अर्थाचे ट्विट थरुर यांनी केलेय.
आपण भारतात एक शब्द शिकून घेतला पाहिजे
आपल्या ट्विटमध्ये शशी थरुर म्हणतात की, आपण भारतात एक शब्द शिकून घेतला पाहिजे तो म्हणजे, अॅनॉक्रॉसी. हे असे सरकार असते जे लोकशाहीला हुकुमशाहीबरोबर मिक्स करते. ते निवडणुकीला परावनगी देतात, विरोधीपक्षाला त्यात सहभागीही होऊ देतात. त्याचवेळी अशा कालावधीत नाममात्र स्पर्धा सामावून घेणार्या (सरकारी) संस्था अस्तित्वात असतात. मात्र असे असले तरी ते कशाची जबाबदारी घेत नाहीत, असे शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अशा पद्धतीने शशी थरुर यांनी कठीण शब्द वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असे कठीण शब्द वापरले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. यावरुनच हे ट्विट असल्याचे म्हटले जात आहे.