शत्रुघ्न सिन्हांची पत्नी पूनम लखनौतून सपकडून लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:37 AM2019-04-15T04:37:19+5:302019-04-15T04:37:40+5:30
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लखनौ मतदारसंघात विरोधकांकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना उतरवले जाऊ शकते.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लखनौ मतदारसंघात विरोधकांकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना उतरवले जाऊ शकते. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल असून सहा मे रोजी मतदान होईल. विरोधकांनी अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशात ६३ उमेदवार जाहीर केले असून जन अधिकार पक्षी, अपना दल (कृष्णा पी) आणि डीएनएफ यासारख्या छोट्या पक्षांसाठी १३ जागा सोडल्या आहेत.
चारपैकी वाराणसी आणि लखनौतील उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. जागा वाटपाच्या करारानुसार समाजवादी पक्ष लखनौ आणि वाराणसीतून लढणार आहे तरीही सपने लखनौतील उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. सपने अभिषेक मिश्रा यांचे नाव लखनौसाठी जाहीर केले होते. परंतु, त्यांना निवडणूक चिन्ह दिले नाही. समाजवादी पक्ष-काँग्रेस यांच्यात गुप्त करार झाला आहे, असे स्पष्टपणे दिसते. त्यानुसार भाजपकडील ब्राह्मण, बनिया आदी उच्चवर्णीयांची मते खाण्यासाठी व दलित-यादव आणि मुस्लिमांना त्यातून मदत मिळेल असा विचार मिश्रा यांच्या उमेदवारीमागे आहे.
पूनम सिन्हा यांना याच गणितातून सपच्या तिकिटावर उतरवले जाऊ शकते. काँग्रेसच्या तिकिटावर पाटणा साहिब मतदारसंघातून लढत असलेले शत्रुघ्न सिन्हा यांना तुमच्या पत्नी सपच्या तिकिटावर लखनौतून लढणार का, असे विचारल्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘सपने जर पूनम सिन्हा यांना लखनौतून तिकीट दिले तर तेथे लखनौत काँग्रेस उमेदवार देणार नाही अशा व्यवस्थेला परवानगी द्यावी, अशी खास विनंती मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केली होती.’ प्रत्यक्षात सिन्हा यांनी राहुल गांधी यांचे त्यांनी दिलेल्या आणखी एका सवलतीबद्दल आभार मानले पाहिजेत. राहुल गांधी यांनी लखनौत मला पत्नीचा प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र मी सपच्या इतर कोणत्याही मतदारसंघात प्रचार करायचा नाही या अटीवर.
>सिंधी असल्याचा लाभ होणार
पूनम सिन्हा या सिंधी असल्यामुळे तेथील १.२५ लाख मतांचा त्यांना जास्तीचा फायदा होऊ शकतो. सिंधी मते ही मोठ्या संख्येने परंपरेने भाजपला मिळतात कारण लालकृष्ण अडवाणी हे सिंधी होत. १९९६ पासून भाजप लखनौत कधीही पराभूत झालेला नाही.