सत्तासुंदरी हातची गेल्याने शेलार देवदास बनले; राजू शेट्टी तमाशातील तुणतुण्याच्या टोल्यावर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 05:18 PM2020-12-24T17:18:33+5:302020-12-24T17:19:46+5:30
Raju shetty angry on Ashish Shelar comment: केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असून देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी हा कायदा पालटून दाखवावा, असे आव्हान आशिष शेलार यांनी दिले.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषदेच्या मोहापायी तमाशातील तुणतुणे हातात घेण्याची वेळ एका शेतकरी नेत्यावर आली आहे, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राजू शेट्टींचे नाव घेता लगावला होता. यावर शेट्टी यांनीदेखील लगेचच शेलारांना प्रत्यूत्तर दिले आहे.
कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषदेच्या मोहापायी तमाशातील तुणतुणे हातात घेण्याची वेळ एका शेतकरी नेत्यावर आली आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळत आमदार आशिष शेलार यांनी लगावला.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चा यांच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेलार बोलत होते. कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व राज्यात नवक्रांती घडून येणार आहे, असे शेलार म्हणाले.
आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष राहूल महाडिक, संग्राम महाडिक, सागर खोत, सुनील खोत, सभापती जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार आशिष शेलार म्हणाले, या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही मूठभर लोकांची भावना अडते आणि दलालांचे समर्थन करणारी आहे. केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असून देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी हा कायदा पालटून दाखवावा.
राजू शेट्टींना तमाशातील तुणतुणे म्हटल्याचे कळताच शेट्टींनीदेखील शेलारांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे. सत्ता सुंदरी हातातून निसटल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदास सारखी झालीय, असे शेट्टी म्हणाले.