नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:01 PM2024-09-18T14:01:14+5:302024-09-18T14:03:20+5:30

Dindori Assembly Election 2024 : दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या नरहरी झिरवळांचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच टेन्शन वाढवले आहे. शिंदेंच्या माजी आमदाराने झिरवळ यांच्या विरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे.

Shinde's former MLA imposed a fine against Narahari Jiravala, challenge from Dindori! | नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!

नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!

Dindori Vidhan Sabha 2024 : २००४, २०१४ आणि २०१९... तीन वेळा दिंडोरीचे आमदार झालेल्या नरहरी झिरवळांसमोर महाविकास आघाडीऐवजी महायुतीतूनच आव्हान उभे राहिले आहे. २००९ मध्ये नरहरी झिरवळांचा पराभव करणारे माजी आमदार धनराज महाले यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. झिरवळ यांनी केलेल्या एका विधानाला उत्तर देताना धनराज महाले यांनी शिवसेनेकडून स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली.

महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असून, काही जागांवर एकमत झाल्याचे तिन्ही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण, तीन पक्ष एकत्र असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरी होण्याची चर्चा आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातही अशीच स्थिती दिसत आहे. 

नरहरी झिरवळ विरुद्ध धनराज महाले; महायुतीतच कुस्ती 

आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात झिरवळ यांना पहिले आव्हान महायुतीतूनच देण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

काही दिवसांपूर्वी झिरवळ यांनी माजी आमदार महालेंवर निशाणा साधला होता. "महाले हे प्रबळ दावेदार नाहीत. ते पराभूत होण्यासाठी उमेदवारी करत आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे. महाले यांनी उमेदवारी करू नये", असे झिरवळ म्हणालेले. 

शिवसेनेचे महालेंनी स्वतःची उमेदवारी केली जाहीर

झिरवळांनी डिवचल्यानंतर माजी आमदार धनराज महाले यांनीही प्रत्युत्तर दिले. "आमदार झिरवळ गैरसमजात आहेत. त्यांनी जमिनीवर यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने दिंडोरी मतदारसंघातून मी यावेळी उमेदवारी करणार आहे."

"कोणत्याही स्थितीत मी निवडणुकीला सामोरे जाईन. वेळ आली तर अपक्ष उमेदवारी करण्याची देखी माझी तयारी आहे. आमदार झिरवळ यांनी गैरसमजात जगू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे", असे सांगत महाले यांनी झिरवळांविरोधात दंड थोपटले आहेत. 

दिंडोरीतून झिरवळ सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असेल. त्यामुळे महाले यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताच कमी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवणे किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे पर्याय सध्या त्यांच्यासमोर आहेत. 

महालेंनी झिरवळांचा केला होता पराभव

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ २००४ मध्ये पहिल्यांदा निवडून आले होते. २००९ मध्ये शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला आणि विधानसभा गाठली. त्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकीत झिरवळ यांनी महालेंचा पराभव केला.

२००९ मध्ये धनराज महाले यांना ६८,५६९ मते मिळाली होती. तर नरहरी झिरवळ यांना ६८,४२० मते मिळाली होती. अवघ्या काही मतांनी झिरवळांचा पराभव झाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झिरवळ यांनी पुन्हा गुलाल उधळला. झिरवळ यांना ६८,२८४, तर धनराज महाले यांना ५५,६५१ मते मिळाली होती.

Web Title: Shinde's former MLA imposed a fine against Narahari Jiravala, challenge from Dindori!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.