"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:34 PM2024-10-18T23:34:48+5:302024-10-18T23:39:19+5:30
Santosh Bangar Controversy: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कळमनुरीचे उमेदवार संतोष बांगर यांनी एक विधान केले आहे. त्यांची तक्रार अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Santosh Bangar News: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे बाहेर गावच्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी केलेल्या विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना संतोष बांगर यांनी बाहेर गावी असलेल्या मतदारांची यादी द्या. त्यांना फोनपे, जे काय लागेल, ते पोहोचलं पाहिजे, असे संतोष बांगर म्हणाले. त्यांच्या या विधानाची तक्रार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संतोष बांगर काय म्हणाले?
"मी तुम्हाला सांगितलंय की, बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसात आमच्याकडे आली पाहिजे. त्यांना सांगायचं गाड्या करा. गाड्यांना काय लागतं, ते तुम्हाला सांगतो मी, त्यांना फोन पे, काय ते, जे काय असेल ते पोहोचलं पाहिजे. त्यांना सांगायचं की, काय जे असेल बापू, येण्या-जाण्याचे तू आमच्यासाठी यायलास. बाहेरची व्होटिंग सगळी आपल्या गावापर्यंत आली पाहिजे", असे विधान संतोष बांगर एका प्रचार सभेत बोलताना म्हणाले.
मतदारांना पैशाचे आमिष दाखवल्याचा हा प्रकार आहे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणुक आयोगाचे लक्ष वेधले आहे.
अंबादास दानवेंचं निवडणूक आयोगाला आव्हान
"...त्यांना सांगा गाड्या करा. त्यासाठी फोन पे वगैरे काय लागेल ते सगळं पोहोचलं पाहिजे..' हे वाक्य आहे मिंधे गटाचे कळमनुरीतील आमदार संतोष बांगर यांचे. असं उघड पैशांचे आमिष दाखवण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे. यांच्यावर इलेक्शन कमिशन कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का?", असे म्हणत अंबादास दानवे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'..त्यांना सांगा गाड्या करा. त्यासाठी फोन पे वगैरे काय लागेल ते सगळं पोहोचलं पाहिजे..' हे वाक्य आहे मिंधे गटाचे कळमनुरीतील आमदार संतोष बांगर यांचे. असं उघड पैशांचे अमिश दाखवण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे. यांच्यावर इलेक्शन कमिशन @ECISVEEP कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का?… pic.twitter.com/3sHKRdUu8o
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 18, 2024
कळमनुरीचे आमदार असलेल्या संतोष बांगर हे अनेकदा त्यांच्या विधानामुळे वादात सापडलेले आहेत. त्यांनी यापूर्वीही राजकीय विधाने केली आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर संतोष बांगर यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला.