शिरोळे की बापट? भाजपामध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:43 AM2019-03-06T04:43:09+5:302019-03-06T04:43:29+5:30
पश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय.
- सुकृत करंदीकर
पश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय. सन २०१४ मध्ये भाजपाने पुणे मतदारसंघ विक्रमी मताधिक्याने जिंकला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेला नाकारत पुण्यातल्या सहाच्या सहा विधानसभा भाजपाच्या पारड्यात टाकल्या. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीत तर भाजपाने पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली. आता महापालिकेपासून मुंबई-दिल्लीपर्यंत ‘शत-प्रतिशत भाजपा’ अशी पुण्याची स्थिती आहे. संघटनात्मक पातळीवर कधी नव्हे, इतके सर्व थरातील कार्यकर्ते भाजपाच्या बाजूला आहेत. इतकी ताकद भाजपाला पुण्यात यापूर्वीच्या इतिहासात कधीच लाभलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुणे हा भाजपासाठी केवळ प. महाराष्ट्रातलाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातला सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणावा लागेल.
अर्थात, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. भाजपाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनाच २०१९ मध्ये पुन्हा उमेदवारी मिळणार का, इथून संभ्रम चालू होतो. खासदार म्हणून शिरोळे यांची कामगिरी लक्षणीय असली तरी केलेल्या कामांची प्रसिद्धी आणि जनसंपर्क या पातळीवर शिरोळे कमी पडतात, असे भाजपातून सांगितले जाते. कॅबिनेटमंत्री गिरीश बापट लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. भाजपाचा उमेदवार कोण, याबद्दलचा निर्णय तूर्तास अधांतरी आहे. काँग्रेस आघाडीकडून कोण उमेदवार येतो, याचा अंदाज घेऊन भाजपाचा उमेदवार निश्चित केला जाऊ शकतो.
उमेदवार निवडीबाबत काँग्रेसमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. आघाडीच्या जागावाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र राज्यस्तरीय वाटाघाटींमध्ये पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणार का, ही भीती काँग्रेसजनांना आहे. पुणे काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्लाही आहे. अडीच-तीन लाखांची त्यांची हक्काची मतपेढी येथे आहे. विजयास आवश्यक त्या पुढची मते कोण खेचू शकतो, याबद्दलचे पर्याय तपासले जात आहेत. यातूनच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे नाव पुढे आले. गायकवाड यांच्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणाची तसेच काँग्रेसअंतर्गत गटबाजीची भीती निष्ठावंत व्यक्त करतात. त्यामुळेच उमेदवारीचा वाद सध्या दिल्लीदरबारी आहे. पुण्यातली लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवरच लढली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेस एकदिलाने लढल्या तर शक्ती असूनही भाजपाची दमछाक होऊ शकते. पण काँग्रेसला एकसंध कोण ठेवणार, हाच महत्त्वाचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
>सध्याची परिस्थिती
संघटनात्मक पातळीवर भाजपाची वाटचाल जोरदार आहे. कधी काळी ठराविक वर्गापुरता मर्यादित भाजपा सर्व स्तरांत पसरला आहे. संघाचे संघटन जोडीला आहे. सन २०१४ पासूनच्या तीन सलग पराभवांनी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर व्हायला तयार नाही. संघटन मजबूत करण्याला प्राधान्य देण्याऐवजी गटबाजीचा जोर अजून कायम आहे.मनसेच्या विश्वासार्हतेला जोरदार धक्का बसला आहे. मनसे काँग्रेस आघाडीला मदत करणार की स्वतंत्र लढणार, याचा निर्णय अजून न झाल्याने पक्षपातळीवर सामसूम आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा स्वतंत्र उमेदवार कोणासाठी डोकेदुखी ठरणार, याबद्दल तर्कवितर्क आहेत. आंबेडकर-ओवेसी यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे.