Lok Sabha Election 2019: शिवसेनेकडून 21 उमेदवार जाहीर, लोकसभेच्या पीचवर दोन नवीन फलंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:18 PM2019-03-22T15:18:12+5:302019-03-22T18:16:46+5:30
अखेर शिवसेनेकडून पहिली उमेदवार यादी जाहीर
मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष भाजपा पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. शिवसेना यंदा एकूण 23 जागा लढवणार आहेत. शिवसेनेनं पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहे. सातारा आणि पालघरचे उमेदवार शिवसेनेकडून रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपानं काल महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्याआधी काँग्रेस, राष्ट्रवादीनं उमेदवारी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची यादी कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेनं अपेक्षेप्रमाणे जवळपास सर्व खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. उस्मानाबादमध्ये शिवसेनेनं उमेदवार बदलला आहे. या ठिकाणी रवी गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केल्यानं ते चर्चेत आले होते. त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे.
सध्या भाजपाकडे असलेला पालघर मतदारसंघ यंदा शिवसेनेकडे आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार संघर्ष झाला होता. शिवसेनेनं चिंतामण वनगा यांच्या मुलाला रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपानं राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत गावित यांनी वनगा यांचा पराभव केला. या निवडणुकीच्या तोंडावर गावित काँग्रेसमधून भाजपामध्ये आले होते. तर साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पाटील सध्या भाजपामध्ये आहेत. त्यांनी आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे.
शिवसेनेनं जाहीर केेलेले उमेदवार:
उत्तर पश्चिम मुंबई- गजानन किर्तीकर
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
कल्याण- श्रीकांत शिंदे
ठाणे - राजन विचारे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
रायगड- अनंत गीते
हिंगोली- हेमंत पाटील
रामटेक - कृपाल तुमाने
कोल्हापूर- संजय मंडलिक
हातकणंगले- धैर्यशील माने
शिर्डी- सदाशिव लोखंडे
औरंगाबाद- चंद्रकांत खैरे
यवतमाळ- भावना गवळी
बुलडाणा- प्रतापराव जाधव
अमरावती- आनंदराव अडसूळ
मावळ- श्रीरंग बारणे
शिरुर- शिवाजीराव आढळराव पाटील
द. मुंबई - अरविंद सावंत
नाशिक- हेमंत गोडसे
परभणी- संजय जाधव