"देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच" सामनामधून भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 07:32 AM2020-09-09T07:32:37+5:302020-09-09T09:41:50+5:30
मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये.
मुंबई - मुंबईचा अवमान आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा विरोधकांवर घणाघात केला आहे. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच म्हणजे मातीशी बेईमानीच आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये, असा टोला शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून भाजपाला लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून भाजपाचे नाव न घेता टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्टाचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे. पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती भारताची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रातील ११ कोटी मराठी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो. पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षाकवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले १०६ हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. कुणी ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी, याविरोधात महाराष्ट्राने एकवटायला हवे. तसेच भाजपा मुंबईचा आणि राज्याचा अवमान करणाऱ्यांना सरळ पाठिंबा देत आहे, असा आरोपही या अग्रलेखातून करण्यात आला.
शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी पंतप्रधान म्हणून मोदींचा अवमान कदापि सहन करणार नाही, मोदी हे आज एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून संस्था आहेत. तेच राज्याराज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आणि राज्यांच्या प्रांतिक अस्मितेबाबत बोलता येईल. राजकीय अजेंडे पुढे राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच म्हणजे मातीशी बेईमानीच आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेईमान लेकाचे या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये, इतकीच अपेक्षा, असा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी