राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवरून शिवसेना - भाजप आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:58 AM2021-08-19T07:58:02+5:302021-08-19T07:58:27+5:30
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार व शुक्रवार जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी राणे हे शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे पुन्हा एकदा शिवाजी पार्क परिसरात शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राणे यांनी यात्रेवेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, राणे यांना शिवसैनिक स्मृतिस्थळावर येऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे वादाची स्थिती निर्माण झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार व शुक्रवार जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी राणे हे शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. यावर शिवसेनेने हरकत घेत जोरदार विरोध केला आहे. शिवसेनेचे विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्यासारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा नेत्याला स्मृतिस्थळाला भेट शिवसैनिक देऊ देणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
राऊत यांच्या विधानामुळे शिवाजी पार्कात पुन्हा एकदा भाजप, शिवसेना एकमेकांविरुद्ध भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, भाजपने मात्र शिवसेनेच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्या दर्शनासाठी अटकाव घालणे म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. विरोध करायचा की नाही हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. आमच्या दौऱ्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करणे हा कार्यक्रम असून तो आम्ही शांतपणे पार पाडणार आहोत, असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
राणेंची कारकिर्द बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घडली. त्यांच्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आज केंद्रात मंत्री आहे. आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनीही राणे यांचे मनापासून कौतुक केले असते. त्यामुळे छोट्या मनोवृत्तीचे नेते अशा थोर नेतृत्वाचे दर्शन घेत असताना विरोध करू शकत नाहीत, असा टोलाही दरेकरांनी हाणला.
उद्या जोगेश्वरीत शक्तिप्रदर्शन
शुक्रवारी दुपारी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, श्यामनगर तलाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने येत आहेत. स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्या कार्यालयाजवळ ही सभा आयोजित केली आहे. भाजपने तिथे शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे.