हिंदुत्वापासून दूर गेल्याचं शिवसेनेनं दाखवून दिलंय; अमित ठाकरेंचं टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:09 AM2021-02-15T04:09:50+5:302021-02-15T09:52:13+5:30
शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानं अमित ठाकरेंची शिवसेनेवर टीका
नागपूर : शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते नागपूर येथे एक दिवसीय खाजगी दौऱ्यावर आले होते.
शिवसेनेने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारून ते हिंदुत्वापासून दूर गेल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे असे घडल्याचा आरोप त्यांनी केला. महापुरुषांच्या जयंती आपण सणासारख्या साजरी केली पाहिजे. त्यामुळे सरकारने शिवजयंतीच्या मिरवणुकीकरिता परवानगी दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या कामकाजावर नागरिक नाखूश आहेत. आरोग्य सेवक, शिक्षक, तरुण यांच्यासह सारेच आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत असे मत व्यक्त करून ठाकरे म्हणाले, माझ्यावर पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे, ती योग्यरीत्या पार पाडण्यासाठी आधी पक्ष बांधणी करण्याचे ठरवले आहे. मी इतर पक्ष काय करतात याचा विचार करीत नाही. मला माझा पक्ष वाढविण्यासाठी काय करता येईल याचा विचार करतो. आपण नागरिकांचे मूळ प्रश्न अद्याप सोडवू शकलो नाही. त्यामुळे आधी आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती मिळाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी उपस्थित होते.