"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?"
By प्रविण मरगळे | Published: January 6, 2021 02:09 PM2021-01-06T14:09:38+5:302021-01-06T14:18:12+5:30
भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले.
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातल्याने आता राजकारण रंगू लागलं आहे, शिवसेनेकडून भाजपाचा पारंपारिक गुजराती मतदार खेचण्यासाठी गुजराती समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे, त्यासाठी शिवसेनेने जिलेबी मा फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं घोषवाक्य गुजराती भाषेत म्हणत गुजराती समाजाला आवाहन केलं आहे.
शिवसेनेच्या या खेळीवर भाजपाने जोरदार टीका केली, त्यावर आता शिवसेनेने पलटवार केला आहे. गुजराती माणसाने उद्धव ठाकरे याना आपडा म्हटल्यावर भाजपाच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक! ते कालपासून नुसता खळ खळ करतायत, अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे? भाजपाला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा सवाल शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी विचारला आहे.
तसेच गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले, १९९२-१९९३ च्या दंगलीमध्ये गुजराती बांधवाना खरी मदत केली, संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी, मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना आपलेपण दिले ते उद्धव ठाकरे यांनी, भाजपाने फक्त मतदान होण्यापुरते गुजराती बांधवांना वापरले. आपडो माणस म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप हेमराज शहा यांनी केला.
त्याचसोबत भाजपाचे अतुल भातखळकर फार मोठ्या बाता मारत होते म्हणे गुजराती मतदार सोडा मराठी मतदार पण शिवसेनेला मतदान करणार नाही, भातखळकर तुमची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे, बाबरी यांनी पाडली नाही, राममंदिराचा निर्णय घेतला नाही, पैसा जनतेचा वापरणार, मग श्रेय कसले? असा सवाल आता देशाची जनता तुम्हाला विचारते आहे, देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवले होते हे तुम्ही विसरलात त्याची फळे आज भलतेच कोणी चाखत आहे, भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले.
दरम्यान, भातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपाने त्याला स्वतःची जागीर समजू नये, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच आपडा वाटणार कारण ते सुसंस्कृत माणूस आहे, गुजराती माणसाला ते आवडतात , तुम्हाला जळफळाट होण्याचे कारण ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्हीनंतर खोटी आश्वासन देऊन फसवता, मुंबईत फक्त लोढा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको म्हणून सर्व भाजपावर गुजराती समाज नाराज आहे आणि त्याना शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपले वाटतात, भाजपच्या पायाखालची वाळू गुजराती समाज सरकावल्या शिवाय राहणार नाही असा इशारा हेमराज शहा यानी भाजपाला दिला आहे.