कर्मांचा हिशोब होईल, त्यावेळी काय करणार?; 'गुरुवाणी'चा अर्थ सांगत शिवसेनेचा मोदींवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Published: December 22, 2020 07:41 AM2020-12-22T07:41:30+5:302020-12-22T07:42:11+5:30

शिखांच्या अन्नधान्याचे, पोटापाण्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत व शिखांच्या गुरूंसमोर नतमस्तक व्हायचे, हे नाटक आहे, असे विरोधक म्हणत असतीलही, पण मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये. 

shiv sena indirectly slams pm modi over farmers protest over new farm laws | कर्मांचा हिशोब होईल, त्यावेळी काय करणार?; 'गुरुवाणी'चा अर्थ सांगत शिवसेनेचा मोदींवर निशाणा

कर्मांचा हिशोब होईल, त्यावेळी काय करणार?; 'गुरुवाणी'चा अर्थ सांगत शिवसेनेचा मोदींवर निशाणा

Next

मुंबई: नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी जवळपास महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा झाली असली, तरीही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी विरुद्ध सरकार असा थेट संघर्ष सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांची आंदोलनाची पुरेशी दखल घेत नसल्यानं विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आता या मुद्द्यावरून शिवसेनेनं गुरुवाणीचा अर्थ सांगत मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

'प्राण जाए पर वचन न जाए, सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं', असा बाणा औरंगजेबाला दाखवणारे गुरू तेगबहादूर हे छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच धर्मवीर ठरले. त्यामुळे शिखांच्या शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वारा रकीबगंज येथे पोहोचले, तरी दिल्लीच्या सीमेवरील पंजाबचा शेतकरी विचलित झाला नाही. त्याचा संघर्ष, त्याचा लढा सुरूच राहिला. पंतप्रधान मोदी यांनी गुरू तेगबहादूर यांच्याकडून प्रेरणा घेतली. आनंद आहे. दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीख लढवय्येसुद्धा त्याच प्रेरणेतून लढत आहेत. त्यामुळे लढाईचा अंत काय, हा प्रश्नच आहे, असं 'सामना'नं अग्रलेखात म्हटलं आहे.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- दिल्लीतील रकीबगंज गुरुद्वारात पंतप्रधान मोदी अचानक गेले. गुरू तेगबहादूर यांच्या समाधीपुढे त्यांनी माथे टेकवले. यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? मोदी यांनी कोणतीही कृती केली तरी ते नाटक किंवा ढोंगच आहे, असे मानून विरोधक टीका करतात. हे काही योग्य नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अनेकदा मंदिर, मशीद, गुरुद्वारात गेल्याच आहेत. ईदचा शिरकुर्मा आणि बिर्याणी तर अनेकांनी चापली आहे, पण मोदी यांच्याबाबतीत विरोधक वेगळी भूमिका घेतात याचे आश्चर्य वाटते. 

- शिखांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू असतानाच पंतप्रधान रकीबगंज गुरुद्वारात अत्यंत साधेपणाने गेले. पोलिसी सुरक्षेचा लवाजमा दूर ठेवून ते गुरुद्वारात गेले व तेगबहादूर यांच्या समाधीपुढे दंडवत घातला. त्यानंतर आपले पंतप्रधान म्हणतात, 'मी ऐतिहासिक गुरुद्वारा रकीबगंज साहिब येथे भेट दिली. येथेच गुरू तेगबहादूरजी यांच्या पवित्र पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. जगभरातील कोटय़वधी लोकांप्रमाणेच मीदेखील गुरू तेगबहादूर यांच्या दयाळूपणाने प्रेरित झालो आहे.' पंतप्रधान मोदी यांनी केशरी पगडी घालून सामान्य नागरिकांप्रमाणे दर्शन घेतले. असे सांगतात की, पंतप्रधान येत आहेत याची आगाऊ कल्पना गुरुद्वारा प्रबंधकांना नसल्याने मोदींना पाहून त्यांनाही धक्काच बसला.

- शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबचा शीख समुदाय नाराज आहे. तो मोदींविरोधी घोषणा देत आहे. या पंजाबच्या शेतकऱ्यांना अतिरेकी, खलिस्तानी वगैरे ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भडकलेल्या शिखांच्या भावनांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न मोदींनी केला, असे आता म्हटले जात आहे. शिवाय, मोदी गुरुद्वारात गेले त्यामागे राजकारण आहे. शिखांविषयी इतकेच प्रेम होते तर पंजाबच्या शेतकऱ्यांना एक महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर का उभे केले आहे? शिखांच्या अन्नधान्याचे, पोटापाण्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत व शिखांच्या गुरूंसमोर नतमस्तक व्हायचे, हे नाटक आहे,' असे विरोधक म्हणत असतीलही, पण मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये. 

- मोदी हे अचानक रकीबगंज गुरुद्वारात पोहोचले. त्याच वेळी तेथे जी 'गुरुवाणी' सुरू होती, त्याचा थोडक्यात सारांश असा - तुम्ही सेवा करता. ईश्वराची भक्ती करता. करीतही असाल, पण तुमचे विचार बदलले नाहीत तर त्या सेवेचा, भक्तीचा काय उपयोग? तुम्ही धर्मग्रंथांची अनेक पारायणे केली, परंतु त्यातील उपदेश, शिकवणूक तुम्ही समजून घेतली नाही, त्याचा अंगीकार मानवतेच्या कल्याणासाठी केलाच नाही तर धर्मग्रंथांच्या त्या पारायणांचा काय उपयोग? अशा वेळी जेव्हा तुमची 'वेळ' येईल, तुमच्या कर्मांचा 'हिशोब' होईल त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठे तोंड लपविणार? काळापासून कोणीही स्वतःचा बचाव करू शकलेले नाही आणि करू शकणार नाही, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा!
 

Web Title: shiv sena indirectly slams pm modi over farmers protest over new farm laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.