पुन्हा भाजपसोबत जाणार का?; 'नव्या समीकरणा'चा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले...
By कुणाल गवाणकर | Published: November 29, 2020 08:45 AM2020-11-29T08:45:49+5:302020-11-29T08:49:43+5:30
आदित्य ठाकरेंना भाजपवर निशाणा; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला सवाल
मुंबई: आम्ही ज्यांना मित्र समजत होतो, ते तर शत्रू निघाले, अशा शब्दांत पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. वैयक्तीक टीका करत ही मंडळी इतक्या खालच्या थराला जातील असा विचार मी कधीही केला नव्हता. आम्ही कधीही अशा प्रकारच्या टीका केली नाही. पण ठीक आहे. जनता सगळं पाहतेय, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'शी बोलत होते.
तुम्ही ज्यांच्यासोबत इतकी वर्षे एकत्र काम केलं, सरकार चालवलं, तेच आज तुमच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. ते आधीचं नातं संपलंय का? शिवसेना पुन्हा कधीही भाजपसोबत जाणार नाही का? राजकारणात कधीही कोणतंही वळण येऊ शकतं. तुमच्या बाबतीतही असं होऊ शकतं का?, असे प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आले. त्यावर आम्ही कधीही कोणाशीही शत्रुत्व पत्करलं नाही. कोणाशीही वैयक्तिक वैर पत्करून बदल्याच्या भावनेनं राजकारण केलं नाही, असं उत्तर आदित्य यांनी दिलं.
'आम्ही कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीका केली नाही. आता समीकरणं बदलली आहेत. जिथे आम्हाला विश्वास मिळाला आहे, मैत्रीचा हात मिळाला आहे. ज्यांना आम्ही मित्र समजत होतो, ते आम्हाला शत्रू समजू लागले आहेत आणि ज्यांना आम्ही विरोधी पक्ष समजत होतो, त्यांनी आम्हाला मैत्रीचा हात दिला आणि राज्याच्या विकासासाठी पुढे आले. हे एक नवं समीकरण आहे. आम्ही राज्य आणि देशाच्या कल्याणासाठी चांगलं काम करू,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पीडीपी, जदयूसोबत युती करता, तेव्हा हिंदुत्व कुठे जातं?
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो. त्यावरून आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. 'भाजप जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करू शकतो. बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत हातमिळवणी करू शकतो. भाजप अशा पक्षांसोबत युती करतो आणि दुसऱ्यांना हिंदुत्वाबद्दल प्रमाणपत्र देतो. शिवसेनेत भावनेला महत्त्व आहे आणि प्रत्येक शिवसैनिक आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.