पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 07:54 PM2021-02-09T19:54:37+5:302021-02-09T19:58:43+5:30
पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही, राऊत यांचं वक्तव्य
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या संबोधनादरम्यान आंदोलनजीवी असा उल्लेख केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही सर्वकाही आहोत, आम्ही बुद्धीजीवी आहोत, आम्ही आंदोलनजीवी आहोत, आम्ही कमलजीवी आहोत. हा देश जीवांनीच तयार झाला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी हे स्वत: एक आंदोलनजीवी होते," अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम अयोध्येचा प्रवास केला. ते श्रीनगरच्या लाल चौकातही गेले. महाराष्ट्रात भाजप आंदोलन करत आहे. तर काय भाजपा पंतप्रधानांविरोधात आंदोलन करत आहे का? पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही. हा देश जनआंदोलनातूनच तयार झाला आहे," असंही राऊत यावेळी म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. पंतप्रधानांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु लोकांनाही त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीदेखील आंदोलन केल्याचं ते म्हणाले.
देशभक्त आणि देशद्रोहींची निराळी व्याख्या
"देशभक्त आणि देशद्रोहींची आता वेगळी व्याख्या तयार झाली आहे. जे भाजप विरोधी सरकार आहे त्यांनी काहीही केलं तर तो देशद्रोह होतो. मुंबईमध्ये आम्ही टीआरपीचा तपास केला तर बड्या व्यक्तींनी आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधात जे ट्वीट केले ते कोणाच्या दबावाखाली केले का याचा तपास सरकार करत आहे," असं राऊत म्हणाले.
अमित शाहंच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया
यावेळी ५०-५० फॉर्म्युलावर आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती असं अमित शाह म्हणाले होते यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जी चर्चा झाली ती आमित शाह आणि उद्धव ठाकरे यांनाही माहित आहे," असं ते म्हणाले. तसंच सामना कधीही बदलणार नाही. जे लोकं चुका करणार त्यांच्याविरोधात आम्ही लिहित असतो. याबाबतीत महाराष्ट्रात चर्चा होत आहे आणि काँग्रेसही आमच्यासोबतच आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं.